सातारा: दहा फूट लांब, दीडशे किलो वजनाची मगर अखेर जेरबंद, दोन दिवसांपासून माजविली दहशत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 16:57 IST2022-10-28T16:56:40+5:302022-10-28T16:57:43+5:30
वन्यप्राणी बचाव पथकाने पकडलेली मगर वन विभागाने ताब्यात घेतली, तसेच तिला सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.

सातारा: दहा फूट लांब, दीडशे किलो वजनाची मगर अखेर जेरबंद, दोन दिवसांपासून माजविली दहशत
कऱ्हाड : खोडशी, ता. कऱ्हाड येथे गत दोन दिवसांपासून दहशत माजविणाऱ्या मगरीला जेरबंद करण्यात अखेर यश आले. प्राणीमित्र, तसेच वन विभागाच्या प्रयत्नानंतर गावालगतच्या ओढ्यातून ही मगर पकडण्यात आली, तसेच तिला सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. मादी असलेल्या या मगरीची लांबी दहा फूट, तर वजन १४५ किलो होते.
खोडशी गावात दोन दिवस मगरीने भीतीदायक वातावरण निर्माण केले होते. गावातील मुख्य चौकात रविवारी, दि. २३ रात्री मगर आढळून आली. गावातील मुख्य चौकात कृष्णा डेअरीजवळील चौकात हणमंत भोपते, आबासाहेब भोपते, दत्तात्रय भोसले, स्वप्नील भोपते यांना मगर दिसली. त्यांनी याबाबतची माहिती दिल्यानंतर त्याठिकाणी ग्रामस्थांनी पाहणी केली.
अखेर याबाबत वन विभागाला कळविण्यात आले. मात्र, वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी पोहोचेपर्यंत मगर तेथून नजीकच्या ओढ्यात उतरली. त्यामुळे तिला पकडता आले नाही. त्यानंतर सलग दोन दिवस मगरीचे ग्रामस्थांना दर्शन होत होते. मात्र, तिला पकडण्यात यश येत नव्हते.
कऱ्हाडातील वन्यप्राणी बचाव पथकाने अखेर त्यासाठी पुढाकार घेतला. या पथकातील सदस्य सोहेल शेख, रोहित कुलकर्णी, योगेश शिंगण, अजय महाडिक यांनी दोन तास प्रयत्न करून सुरक्षितरीत्या मगरीला पकडले. वनपाल सागर कुंभार, वनरक्षक अरविंद जाधव, योगेश बडेकर, अनिल कांबळे, शंभुराज माने, बाबा बंडलकर, दिपाली अवघडे यांनी त्याठिकाणी भेट दिली. वन्यप्राणी बचाव पथकाने पकडलेली मगर वन विभागाने ताब्यात घेतली, तसेच तिला सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.