मंगळवार तळ्यातून काढला ९०० टन गाळ
By Admin | Updated: January 15, 2015 23:24 IST2015-01-15T19:56:31+5:302015-01-15T23:24:35+5:30
पंधरा दिवस काम : स्वच्छता करताना सापडले कात्या, लोखंड अन् साड्याही... लोकप्रतिनिधींसह ज्येष्ठांचीही दररोज हजेरी

मंगळवार तळ्यातून काढला ९०० टन गाळ
सातारा : वर्षानुवर्षे मूर्ती विसर्जनासाठी उपयोगात आणला जात असलेले मंगळवार तळ्यातून १५ दिवसांत १५० ट्रकमधून तब्बल ९०० टन गाळ काढण्यात आला आहे. यात मोठ्या प्रमाणावर कात्या, लोखंड आणि अनेक वर्षे कुजून पडलेल्या साड्याही सापडल्या आहेत. ‘लोकमत’ च्या रेट्यातून ही स्वच्छता मोहिम सुरू झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.मंगळवार पेठेत असणाऱ्या मंगळवार तळे येथील नागरिकांच्या अस्मितेचा विषय आहे. तळ्याची दिवसेंदिवस होणारी दुर्दशा पाहून येथील नागरिकांच्या डोळ्यात पाणी येत होते. तळ्याच्या स्वच्छतेसाठी परिसरातील नागरिकांनी एकत्र येवून काम करण्याचेही ठरविले होते. तळ्याचे सुशोभिकरण करायचे तर ते कसे होईल याविषयीही कल्पना चित्र तयार करून येथील युवकांनी या तळ्याविषयीची सतत ‘लोकमत’मधून आपली भावना व्यक्त केल्या होत्या.अखेर या तळ्याच्या स्वच्छतेचे काम पंधरा दिवसांपूर्वी सुरू झाले. गेल्या पंधरा दिवसांत तळ्यातून सुमारे १५० ट्रक गाळ काढण्यात आला आहे. आतील पाणी आणि घाण पूर्ण सुकल्यानंतर तळ्यात दोन पोकलेन लावून गाळ काढण्यात येणार आहे. वर्षानुवर्षे तळ्यात गाळ साठून राहिल्यामुळे येथे घाणीचा दर्प येत आहे. रोज सुमारे २५ ते ३० जण काम करत आहेत. मूर्तीचा ढिगारा काढल्यानंतर साड्या आणि तळ्यातील अन्य घाण काढण्याचे आव्हान आहे. कामाची सुरूवात झाल्या दिवसापासून नगरसेवक अविनाश कदम यांच्यासह अनेक ज्येष्ठांनी रोज येथे हजेरी लावून तळ्याचे रूपडे बदलताना पाहिले. रोज सकाळी काम सुरू झाले की तळ्याच्या तटबंदीवर या सर्वांची मैफल जमू लागली. तळ्याचे सौंदर्य आणि लहानपणाची आठवणी यांच्या गप्पा आता रोज सकाळी येथे ऐकायला मिळतात. (प्रतिनिधी)
स्वच्छतेसाठी क्रेन तळ ठोकून..
४तळ्याच्या स्वच्छतेला सुरूवात झाल्या दिवसापासून तळ्यातून कचरा काढण्यासाठी लागणारी क्रेन तळ्यावरच लावून ठेवण्यात आली आहे. तळ्यात उतरलेले कामगार या क्रेनच्या पुढील बाजूस कचरा आणि घाण भरून देतात. त्यानंतर क्रेनने तो कचरा डंपरमध्ये टाकला जातो. सकाळी नऊ वाजता सुरू झालेले हे काम संध्याकाळपर्यंत चालते. क्रेन विषयी शालेय विद्यार्थ्यांना आकर्षण आहे. तळे परिसरात क्रेन उभी राहत असल्यामुळे अनेक शालेय विद्यार्थी या परिसरात सुरू असलेले काम बघत उभे राहतात.