सातारा जिल्हा रुग्णालयात वर्षात जन्मले ४७ जुळे!, काही दिवसापुर्वीच चौळं जन्मल्याची घडली होती दुर्मीळ घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 19:35 IST2025-09-18T19:35:00+5:302025-09-18T19:35:48+5:30
जुळी मुले होण्याचे कारण ?.. जाणून घ्या

संग्रहित छाया
वैभव पतंगे
सातारा : आपल्या घरी नवा पाहुणा यावा, अशी नवीन दाम्पत्यांची इच्छा असते. अनेक महिला केवळ एकच मुलगा किंवा मुलीला जन्म देतात. मात्र, काही वेळा जुळे किंवा तिळे जन्मास येतात. सध्या सर्वत्र जुळी मुले जन्माला येण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा हे खूपच वाढले आहे. सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय जिल्हा रुग्णालयामध्ये गेल्या वर्षभरात एकूण ४७ जुळ्यांनी जन्म घेतला आहे. जेव्हा जुळी मुले जन्माला येतात, तेव्हा नातेवाइकांचा आनंद व्दिगुणित झालेला असतो. जुळी झाली, आता पेढे द्या, असे रुग्णालयात ऐकायलाही मिळते.
मुलांच्या जन्मासाठी आयव्हीएफ, आयसीएसआय, कृत्रिम गर्भाधारण आदी आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर सध्या माेठ्या प्रमाणात वाढला आहे. या तंत्रज्ञानामुळे एकापेक्षा जास्त मुलांच्या जन्माची शक्यता वाढते. उशिरा मूल होऊ देण्याचा निर्णय, गर्भनिरोधकांचा वाढता वापर आणि कमी प्रजनन क्षमता याचाही जुळी मुले जन्माला येण्यामध्ये मोठा वाटा असल्यसाचे तज्ज्ञ सांगतात. जुळ्या मुलांच्या प्रसूतीदरम्यान मुलांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असते, तसेच गरोदरपणात, प्रसूतीदरम्यान आणि प्रसूतीनंतरही आई आणि मुलांसाठी गुंतागुंत निर्माण होण्याचे प्रमाण जास्त असते.
जुळी मुले होण्याचे कारण ?
बहुविध गर्भधारणा सहसा एकापेक्षा जास्त अंडी फलित झाल्यावर होते. जेव्हा एक अंडी फलित होते आणि नंतर दोन किंवा अधिक भ्रूणांमध्ये विभाजित होते, ज्यामुळे दोन किंवा अधिक बाळ होतात.
अशीही दुर्मीळ घटना
सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात एका मातेने एकाचवेळी चार मुलांना जन्म दिला. त्यामध्ये एक मुलगा व तीन मुलींचा समावेश आहे. एकाद्या मातेने एकाचवेळी चार अपत्यांना जन्म देणे ही अत्यंत दुर्मीळ घटना आहे. या महिलेने यापूर्वीदेखील तीन मुलांना जन्म दिला असून, या दाम्पत्यांना सध्या एकूण पाच मुली व दोन मुले आहेत.
जुळ्यांची प्रसूती गुंतागुंतीची असते. यामध्ये आई व बाळाच्या जिवाला धाेका असल्याने विशेष दक्षता घ्यावी लागते. अकाली प्रसूती आणि जन्म ही जुळी किंवा एकाधिक गर्भधारणेची सर्वात सामान्य गुंतागुंत आहे. नवजात बाळामध्ये दृष्टी, श्वासोच्छ्वास, पचनास त्रास आणि संसर्ग होऊ शकतो. अनेक जन्मांमध्ये सिझेरियन होण्याची शक्यता जास्त असते. - डाॅ. युवराज करपे, जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा