थकबाकी असल्याने शाहूपुरीचे ४५ पथदिवे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:26 IST2021-06-22T04:26:26+5:302021-06-22T04:26:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : महाराष्ट्र वीज वितरण विभागीय कार्यालय करंजे एम.आय.डी.सी.सातारा यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार शाहूपुरी स्ट्रिटलाइटचे रुपये ...

45 street lights of Shahupuri closed due to arrears | थकबाकी असल्याने शाहूपुरीचे ४५ पथदिवे बंद

थकबाकी असल्याने शाहूपुरीचे ४५ पथदिवे बंद

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : महाराष्ट्र वीज वितरण विभागीय कार्यालय करंजे एम.आय.डी.सी.सातारा यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार शाहूपुरी स्ट्रिटलाइटचे रुपये दोन कोटींचे आसपास थकबाकी असल्याने शाहूपुरी भागातील स्ट्रिटलाइट बंद करण्याचा निर्णय संबंधित विभागाने घेतला असून, सोमवारी ४५ पथदिवे बंद करण्यात आले आहेत.

शाहूपुरी विभागाची थकबाकीमुळे पथदिवे बंद करण्याचा निर्णय हा दुर्दैवी असून, याला जबाबदार असणाऱ्या प्रशासन व्यवस्थेचा शाहूपुरी ग्रामविकास आघाडी जाहीर निषेध करण्यात आला आहे. शाहूपुरीचा बराचसा भाग डोंगर पायथ्याचा आहे. त्यात पावसाचे दिवस असल्याने लाइटविना होणारे नागरिकांचे हाल टाळण्यासाठी याप्रश्नी सध्याच्या सातारा शहर नगर परिषद प्रशासन व्यवस्थेने शाहूपुरीच्या शिल्लक निधीतून हे वीजबिल भरणा करून शाहूपुरीवासीयांचा अंधार दूर करावा, अशीही मागणी आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

यावेळी, नगरपालिकेच्या वीजपुरवठा विभागाशी व अन्य प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. जर याप्रश्नी तातडीने कार्यवाही न केल्यास जर काही दुर्दैवी घटना घडली तर त्या घटनेची संपूर्ण जबाबदारी याला जबाबदार असणाऱ्या संबंधित प्रशासन व्यवस्थेची असेल याची नोंद घेऊन त्वरित पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी राजेंद्र मोहिते, नवनाथ जाधव, सुहास वहाळकर, शोभा केंडे, नीलम देशमुख, माधवी शेटे या कार्यकर्त्यांनी पत्रकान्वये केली आहे.

कोट :

शाहूपुरी परिसरातील सर्वच पथदिवे वीज बिल न भरल्याने त्यांची सेवा खंडित करण्यात आली आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार ही वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

- शीतल डोळे, सहायक अभियंता, करंजे

शाहूपुरीतील नागरिक हे मालमत्ता कर भरण्यात आघाडीवरच राहिलेले आहेत असे असताना केवळ दूरदृष्टीचा अभाव व मूलभूत नागरी सुविधांबाबतचा बेफिकीरपणामुळे वीजपुरवठा खंडित होणं अयोग्य आहे.

- भारत भोसले, शाहूपुरी विकास आघाडी

Web Title: 45 street lights of Shahupuri closed due to arrears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.