कृष्णा बँकेच्या कर्मचाऱ्यांना २० टक्के पगारवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:36 IST2021-01-03T04:36:45+5:302021-01-03T04:36:45+5:30
कृष्णाकाठच्या ग्रामीण भागाची मुख्य अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृष्णा सहकारी बँकेने कोरोना काळातही नेत्रदीपक कामगिरी करून दाखविली आहे. कोरोना ...

कृष्णा बँकेच्या कर्मचाऱ्यांना २० टक्के पगारवाढ
कृष्णाकाठच्या ग्रामीण भागाची मुख्य अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृष्णा सहकारी बँकेने कोरोना काळातही नेत्रदीपक कामगिरी करून दाखविली आहे. कोरोना काळात आपल्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी बँकेचे कर्मचाऱ्यांनी मोठे साहस दाखविले. कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात दिलेल्या या योगदानाची दखल घेत, बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी सरासरी २० टक्क्यांची भरघोस पगारवाढ देण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या कर्मचारी संवाद मेळाव्यात जाहीर केला.
पारदर्शी कारभार आणि ग्राहकाभिमुख सेवा यासाठी सुप्रसिद्ध असलेल्या कृष्णा सहकारी बँकेने यंदा सुवर्णमहोत्सवी ५० व्या वर्षांत पदार्पण केले आहे. यानिमित्त सहकारमहर्षी दिवंगत जयवंतराव भोसले यांच्या ९६ व्या जयंतीचे औचित्य साधून बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी बँकेसह जयवंतराव भोसले नागरी सहकारी पतसंस्था आणि कृष्णा महिला सहकारी पतसंस्था या तिन्ही संस्थांतील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी व्यासपीठावर कृष्णा बँकेचे उपाध्यक्ष दामाजी मोरे, जयवंतराव भोसले पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील, कृष्णा महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा अलका जाधव, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी. एन. कापसे, अरुण यादव, नितीन देसाई प्रमुख उपस्थित होते. (वा. प्र.)
- चौकट
‘कोरोना योद्धा’ पुरस्काराने कर्मचारी सन्मानित
कोरोना काळात उत्तम कामगिरी करत, ग्राहकांना संकटाच्या काळातही सेवा देणाऱ्या बँक व पतसंस्थांच्या सर्व कर्मचाऱ्यांना या कार्यक्रमात ‘कोरोना योद्धा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. अतुल भोसले यांच्याहस्ते कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
फोटो : ०२केआरडी०५
कॅप्शन : कऱ्हाड येथील कृष्णा सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात उत्तम ग्राहक सेवा दिल्याबद्दल बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्याहस्ते कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.