सातारा : शिवथर (ता. सातारा) येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून ६ लाख, तर वडूथ येथील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून चोरट्यांनी १० लाख ५० हजार लंपास केले. विशेष म्हणजे, ही चोरी होताना बँक अधिकाऱ्यांना मेसेज गेला. परंतु पोलिस यंत्रणा व बँक अधिकारी घटनास्थळी पोहोचेपर्यंत चोरटे पसार झाले. ही धक्कादायक घटना रविवारी मध्यरात्री घडली.शिवथरमधील मुख्य चौकात स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. या एटीएममध्ये मध्यरात्री पाच चोरट्यांनी प्रवेश केला. गॅस कटरच्या साह्याने एटीएम फोडून त्यातील ६ लाख १४ हजार ९०० रुपये रोकड लंपास केली. ही संपूर्ण घटना शिवथर ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. अवघ्या दहा मिनिटांत त्यांनी ही चोरी केली. एटीएम फोडल्यानंतर चोरटे कारमधून पळून गेले. तत्पूर्वी चोरट्यांनी एटीएममध्ये असणारा कॅमेरा तसेच इतर सेन्सरवर काळ्या रंगाचा वापर केला. त्यामुळे चोरट्यांचे चेहरे या कॅमेऱ्यात स्पष्ट दिसत नाहीत.दुसरी घटना वडूथ (ता. सातारा) येथे घडली. या ठिकाणी बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. हे एटीएमसुद्धा गॅस कटरने फोडून त्यातील १० लाख ५० हजारांची रोकड लंपास केली. यावेळी एटीएम फोडल्याचा मेसेज संबंधित अधिकाऱ्याला गेला. त्यानंतर अधिकाऱ्याने सातारा तालुका पोलिस ठाण्यातील बीट अंमलदारांना याची माहिती दिली. पोलिसांनी गावातील उपसरपंच, तसेच ग्रामस्थांना फोन करून जमा होण्यास सांगितले; परंतु ग्रामस्थांना नक्की कोणत्या एटीएममध्ये चोरी होत आहे, हे समजले नसल्याने चोर पळून जाण्यात यशस्वी झाले.
साताऱ्यात दोन एटीएम फोडून १७ लाख लंपास!; बँक अधिकाऱ्यांना मेसेज गेला, पण..
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 12:27 IST