सातारा जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाने १६ जनावरांचा मृत्यू, कोणत्या तालुक्यात सर्वाधिक बाधित.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 18:05 IST2025-07-19T18:02:53+5:302025-07-19T18:05:12+5:30
लम्पीला रोखण्यासाठी उपाययोजना सुरू..

संग्रहित छाया
सातारा : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून लम्पी चर्मरोगाने डोके वर काढले असून, आतापर्यंत ३५४ जनावरांना लागण झालेली आहे. यामध्ये १६ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या १५४ पशुधनावर उपचार सुरू आहेत. तसेच लम्पीच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागानेही उपाययोजना सुरू केल्या आहेत.
जिल्ह्यात तीन वर्षांपूर्वी लम्पी चर्मरोगाने थैमान मांडले होते. हजारो जनावरे आजाराने बाधित झाली होती. तसेच शेकडो जनावरांचा मृत्यू झाला होता. यामुळे जिल्ह्यातील सर्व पशुधनाला लसीकरण करण्यात आले. त्यानंतर लम्पी रोगाला अटकाव बसला होता. मात्र, आताही लम्पी रोग डोके वर काढू लागला आहे. मागील काही दिवसांपासून बाधित जनावरांची संख्या वाढू लागली आहे.
आतापर्यंत ३५४ जनावरांना लम्पीची बाधा झाली आहे. त्यातील १६ पशुधनाचा मृत्यू झाला आहे. तर १८४ जनावरे रोगातून बरी झाली आहेत. सध्या १५४ जनावरांवर उपचार सुरू आहेत. लम्पी बाधितमध्ये माण तालुक्यात सर्वाधिक ५४ जनावरे झाली आहेत. तर कोरेगाव तालुक्यात ३२, खटाव २५, सातारा तालुक्यात २३ आहेत.
लम्पीला रोखण्यासाठी उपाययोजना सुरू..
जिल्ह्यातील लम्पीचा प्रादुर्भाव पाहता जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली लसीचा पुरवठा करण्यात आलेला आहे. तसेच पशुधन विकास अधिकाऱ्यांची बैठक घेऊन लसीकरणाबाबत सूचना करण्यात आलेली आहे. लम्पीच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजनाही करण्यात येत आहेत.