अवकाळीचा फटका; मेघलदरेवाडीत थंडीने गारठून शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2021 16:52 IST2021-12-03T16:51:10+5:302021-12-03T16:52:10+5:30
खटाव परिसरात झालेल्या अवकाळी पावसाने जाखणगाव परिसरातील मेघलदरेवाडी येथील मेंढपाळ कुमार बाबा मदने यांच्या शेळ्या व मेंढ्या थंडीने गारठून मृत्यूमुखी पडल्या. यापूर्वी कोरोनाने हैराण झालेल्या बळीराजाला पुन्हा एकदा निसर्गाने फटका दिल्याने येथील शेतकरीवर्ग पुरता हतबल झाला आहे.

अवकाळीचा फटका; मेघलदरेवाडीत थंडीने गारठून शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू
पुसेगाव : खटाव परिसरात बुधवारी रात्रभर झालेल्या पावसाने जाखणगाव परिसरातील मेघलदरेवाडी (ता. खटाव) येथील मेंढपाळ कुमार बाबा मदने यांच्या लहान-मोठ्या अशा एकूण १५ शेळ्या व मेंढ्या थंडीने गारठून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. यापूर्वी कोरोनाने हैराण झालेल्या बळीराजाला पुन्हा एकदा निसर्गाने फटका दिल्याने येथील शेतकरीवर्ग पुरता हतबल झाला आहे. संबंधित घटनेचा प्रशासनाने तातडीने पंचनामा करून त्या पशुपालकांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मेघलदरेवाडी येथील मेंढपाळ कुमार बाबा मदने यांनी नेहमीप्रमाणे बुधवारी सायंकाळी डोंगरातून शेळ्या-मेंढ्या चारून आणून घराशेजारील अंगणात बांधल्या होत्या. दरम्यान, रात्री अकराच्या सुमारास अचानक जोरदार पावसाने हजेरी लावल्याने कुमार व कुटुंबीयांची तारांबळ उडाली. पाऊस एवढा प्रचंड होता की कुटुंब सहजासहजी घराबाहेर पडूच शकत नव्हते. तरीही जीव धोक्यात घालून जवळपास मिळेल तिथं शेळ्या-मेंढ्या सुरक्षितस्थळी हलवण्याचा प्रयत्न मदने व कुटुंबीयांनी केला; मात्र तोपर्यंत शेळ्या-मेंढ्या खूप गारठल्या होत्या. परिणामी, त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे मदने यांनी सांगितले.
पशुपालक बाळू मदने यांनी सांगितले की, रात्रभर शेळ्या व मेंढ्या पावसातच उभ्या होत्या. पावसामुळे चिखल झाला होता व बसायला जागा नसल्यामुळे काकडून त्यांचा प्राण गेला. परिसरात रात्रभर पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीला मोठा फटाका बसला आहे. रात्रभर पडलेल्या अवकाळी पावसामुळे ओढे, नाल्यांना पूर आला आहे. शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अस्मानी संकटाला सामोरे जावे लागणार असल्याची चिंता शेतकरी वर्गामधून व्यक्त केली जात आहे.