‘आरटीओं’च्या तपासणी मोहिमेमधून १२ लाखांचा दंड वसूल; तब्बल २०९१ वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2023 21:18 IST2023-03-16T21:18:31+5:302023-03-16T21:18:43+5:30
अपघात रोखण्यासाठी विशेष मोहीम

‘आरटीओं’च्या तपासणी मोहिमेमधून १२ लाखांचा दंड वसूल; तब्बल २०९१ वाहनांवर कारवाई
सातारा : वाढते अपघात रोखण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने १ ते १५ मार्च या कालावधीत जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबविली. यामध्ये मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या २०९१ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून तब्बल १२ लाख ६६ हजार ७५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी दिली.
अपघात व अपघाती मृत्यू कमी करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग व इतर महामार्गावर तपासणी मोहीम राबिवण्यात आली. या विशेष तपासणी मोहिमेमध्ये या कार्यालयाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या २०९१ दोषी वाहनांवर कारवाई केली. त्यामधून १२ लाख ६६ हजार ७५० इतका दंड वसूल करण्यात आला.
हेल्मेट - ७५४
वाहन चालविताना मोबाइलचा वापर - २१३
अति वेगाने चालणारी वाहने - ४९०
सीटबेल्ट न लावणे - २१५
चुकीच्या लेनमधून चालणारी वाहने - ३२
धोकादायक पार्किंग - १६९
ट्रीपल सीट - ५५
विमा नसलेली वाहने - १३८
पीयूसी नसलेली वाहने - ६३
योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण नसलेली वाहने - ६५
रिफ्लेक्टर/ टेल लॅम्प - २०
अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी दोन फिरती पथके
या विशेष पथकाने खंडाळा, आनेवाडी टोल नाका या ठिकाणी पथके तैनात करून कारवाई केली. या शिवाय दोन फिरत्या पथकांमार्फत जिल्ह्यात होणाऱ्या अपघातस्थळी तातडीने भेट देण्यासाठी व अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच संबंधित ठिकाणी पुन्हा अपघात होऊ नये यासाठी उपाययोजना सुद्धा राबविण्यात येणार आहेत.