खेळताना लहान भावाला लागलं, वडील रागवतील म्हणून ११ वर्षाच्या शुभ्राने जीवनच संपविले; साताऱ्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 11:59 IST2025-08-20T11:58:42+5:302025-08-20T11:59:04+5:30
आई-वडील वडापावच्या स्टाॅलवर गेल्यानंतर लहान भाऊ आणि बहिणींना शुभ्रा सांभाळत असे

खेळताना लहान भावाला लागलं, वडील रागवतील म्हणून ११ वर्षाच्या शुभ्राने जीवनच संपविले; साताऱ्यातील धक्कादायक घटना
कोरेगाव (जि.सातारा) : घरात खेळता-खेळता लहान भावाच्या डोळ्याला तिच्याकडून चुकून लागलं. वडील घरी आल्यानंतर रागवतील, या भीतीने सहावीत शिक्षण घेणाऱ्या अकरा वर्षांच्या मुलीने गळफास घेऊन आपले जीवन संपविले. ही धक्कादायक घटना वडूथ (ता.सातारा) येथे सोमवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. शुभ्रा प्रवीण राणे (वय ११) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.
प्रवीण राणे यांचे मूळ गाव रत्नागिरी आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून वडूथ येथे ते कुटुंबासमवेत वास्तव्यासाठी आले. साताऱ्यातील सदर बझारमध्ये पती-पत्नीने वडापावचा स्टाॅल सुरू केला. त्यांना तीन मुली व एक मुलगा. हे दोघे वडापावच्या स्टाॅलवर गेल्यानंतर लहान भाऊ आणि बहिणींना शुभ्रा सांभाळत असे. सोमवारी सायंकाळी तिच्या लहान भावाच्या डोळ्याला तिच्याकडून चुकून लागलं. त्यामुळे ती घाबरली. रात्री वडील घरी आल्यानंतर रागावतील आणि मारहाण करतील, अशी भीती तिला वाटली.
तिने भावाला आणि बहिणींना बाहेरच्या खोलीत जावा, असं सांगितलं. यानंतर, तिने खुर्चीवर डबा ठेवून ओढणीने गळफास घेतला. हा प्रकार तिच्या लहान बहिणींच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी शेजाऱ्यांना याची माहिती दिली. शेजाऱ्यांनी हे दृश्य पाहून तत्काळ तिच्या वडिलांना याची माहिती दिली. वडील प्रवीण राणे यांनी तातडीने घरी येऊन मुलीचा गळफास सोडवून तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. डाॅक्टरांनी तिला तपासले असता, तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले.