१०७ कोटीचा घोटाळा; निद्रीस्त वनविभागाला जागे करण्यासाठी साताऱ्यात हलगी नाद आंदोलन
By प्रगती पाटील | Updated: November 20, 2023 17:01 IST2023-11-20T17:00:00+5:302023-11-20T17:01:39+5:30
सातारा : जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांमध्ये सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी १०७ कोटी रूपयांचा आर्थिक घोटाळा केला असल्याने तात्काळ सर्व ...

१०७ कोटीचा घोटाळा; निद्रीस्त वनविभागाला जागे करण्यासाठी साताऱ्यात हलगी नाद आंदोलन
सातारा : जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांमध्ये सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी १०७ कोटी रूपयांचा आर्थिक घोटाळा केला असल्याने तात्काळ सर्व दोषी वन अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना कायमचे सेवेतून बडतर्फ करावे या मागणीसाठी आर. आर. पाटील लोकविकास प्रतिष्ठानच्यावतीने सामाजिक वनीकरण कार्यालयाच्या बाहेर हलगी नाद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. निद्रीस्त वनविभागाला जागृत करण्यासाठी हे आंदोलन केल्याचे दादासाहेब चव्हाण यांनी सांगितले.
याबाबत प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, ‘जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये कोणत्याही प्रकारची वृक्ष लागवड न करता बोगस कागदपत्रे तयार करून सुमारे १०७ कोटी रूपयांचा आर्थिक घोटाळा तत्कालीन विभागीय वनाधिकारी यांनी व विद्यमान विभागीय वनाधिकारी यांनी केला आहे. सर्व तालुक्यांतील वन क्षेत्रपाल व वनपाल यांचीही त्यांना साथ मिळाली आहे. या प्रकरणी वरिष्ठ समिती स्थापन करून सर्व दोषी वन अधिकारी यांच्यावर वनविभागाच्या व शासनाच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल करून त्यांना कायमचे सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणीही करण्यात आली आहे.
वृक्षलागवडीच्या कामासाठी मिळालेली कोट्यावधी रूपयांचा निधी जिरवून अधिकारी व कर्मचारी नामानिराळे असल्याचे दाखवण्याचा फसवा प्रयत्न करत आहेत. शासनाच्या वाहनांचाही गैरवापर केल्याचा समोर येऊनही कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याचा अधिकाऱ्यांचा डाव आहे. या विरोधात ठोस कार्यवाही होत नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवणार आहे. - दादासाहेब चव्हाण, आंदोलनकर्ते