नरसिंहगावात जिल्हा परिषद शाळा होणार ‘मॉडेल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:19 IST2021-06-28T04:19:42+5:302021-06-28T04:19:42+5:30
अर्जुन कर्पे। कवठेमहांकाळ : एकीकडे इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे फॅड वाढत चालल्याने, मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडतात की काय अशी ...

नरसिंहगावात जिल्हा परिषद शाळा होणार ‘मॉडेल’
अर्जुन कर्पे।
कवठेमहांकाळ : एकीकडे इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे फॅड वाढत चालल्याने, मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असताना, तालुक्यातील नरसिंहगावमध्ये मात्र जिल्ह्यातील पहिले जिल्हा परिषदेचे मराठी माध्यमाचे मॉडेल स्कूल उभा राहणार आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यात इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे प्रमाण खूपच वाढत आहे. पालकांचा इंग्रजी माध्यमांकडे आपला पाल्य शिकवण्यासाठी कल दिसून येतो. परंतु इंग्रजी माध्यमाची शैक्षणिक फी सर्वसामान्यांना तसेच मध्यमवर्गीयांनासुद्धा परवडणारी नाही. त्यामुळे इच्छा असूनही इंग्रजी माध्यमातून गोरगरीब आपल्या पाल्याला शिकवू शकत नाहीत.
असे असताना तालुक्यातील नरसिंहगाव येथे उपसरपंच अरुण भोसले, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील शिक्षित नागरिकांनी एकत्रित येत गावांमध्ये मराठी माध्यमाचे एक मॉडेल स्कूल बांधण्याचा निर्णय घेतला. यामध्ये त्यांना जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, राज्यशासन आदी माध्यमातून सहकार्य होणार आहे.
गावातील पाच एकर जागेत पहिली ते आठवी पर्यंत हे मॉडेल स्कूल उभारले जाणार आहे. या मॉडेल स्कूलमध्ये तज्ज्ञ शिक्षक,सेमी इंग्लिश, सर्व खेळ प्रकारची आधुनिक सोयी, सुविधा असणारी क्रीडांगणे, ई- लर्निंग द्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण, सुसज्ज असे वाचनालय, पूर्णपणे मोफत शिक्षण, मोफत पाठ्यपुस्तके, सर्व शासकीय योजनांचा विद्यार्थ्यांना लाभ, विविध परीक्षासाठी विशेष मार्गदर्शन, प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक विकासासाठी वैयक्तिक मार्गदर्शन, सकस मध्यान्ह भोजन योजनेस स्वतंत्र भोजन टेबल कक्ष, बाहेरून येणाऱ्या विध्यार्थ्यांना बसची व्यवस्था, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वछतागृह अशी खास वैशिष्ट्ये या मॉडेल स्कूलची आहेत.
कोट
इंग्रजी माध्यमाच्या शाळापासून गोरगरिबांची मुले वंचित राहू नयेत,त्यांचा शैक्षणिक दर्जा उंचवावा,इंग्रजी माध्यमांच्या शाळेत दिले जाणारे शिक्षण, हे मराठी माध्यमांच्या शाळेत मिळावे.किंबहुना त्याच्यापेक्षा दर्जेदार शिक्षण या मॉडेल स्कूलमध्ये दिले जाईल.
- अरुण भोसले उपसरपंच, ग्रामपंचायत नरसिंहगाव