जिल्हा परिषदेत नेत्रतज्ज्ञ डॉ. भालचंद्र स्मृती दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 16:54 IST2021-06-10T16:51:13+5:302021-06-10T16:54:03+5:30
Zp Sangli : राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम प्रतिवर्षी 10 जून हा दिवस डॉ. भालचंद्र स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने आज जिल्हा परिषद सांगली येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी डॉ. भालचंद्र यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

जिल्हा परिषदेत नेत्रतज्ज्ञ डॉ. भालचंद्र स्मृती दिन साजरा
सांगली : राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम प्रतिवर्षी 10 जून हा दिवस डॉ. भालचंद्र स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने आज जिल्हा परिषदसांगली येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी डॉ. भालचंद्र यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, नेत्र शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील, डॉ. गायत्री वडगांवे, नेत्र चिकित्सा अधिकारी श्री. चांदोरकर, श्री. बाबर, नेत्रदान समुपदेशक अविनाश शिंदे, अभिनंदन पाटील उपस्थित होते.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे म्हणाले, डॉ. भालचंद्र यांनी रूग्णांसाठी अहोरात्र काम केले. त्यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात 10 जून 1924 रोजी झाला. खडतर परिस्थितीवर मात करत त्यांनी जिद्द व चिकाटीच्या बळावर 80 हजाराहून अधिक रूग्णांवर नेत्र शस्त्रक्रिया व उपचार केले.
अंधांचे जीवन प्रकाशमय करणाऱ्या या दिपस्तंभाची ज्योत 10 जून 1979 रोजी मावळली. जयंती व स्मृती दिन एकाच दिवशी येतो. या दिवसाचे औचित्य साधून 10 जून हा दिवस डॉ. भालचंद्र स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी नेत्रतपासणी शिबीरे करून सामान्य जनतेमध्ये नेत्रदानाबाबत जनजागृती केली जाते.
प्रास्ताविकात नेत्र शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील म्हणाले, प्रतिवर्षी दिनांक 10 ते 16 जून या कालावधीत डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टी दिन सप्ताह साजरा केला जातो. या सप्ताहअंतर्गत जिल्ह्यातील नेत्र शल्य चिकित्सक, नेत्रचिकित्सा अधिकारी व नेत्रदान समुपदेशक यांच्याकडून मधुमेह रूग्णांची फंडस्कोपी करणे तसेच म्यूकरमायकोसीस व डोळ्यांची निगा कशी राखावी याचे मार्गदर्शन या दिनानिमित्त केले जात आहे.
वेगवेगळी चर्चासत्रे आयोजित करणे व नेत्रदानाचाबद्दल जनजागृती करणे, लहान मुलांमधील अंधत्व, कोविड पश्चात तसेच म्युकरमायकोसीस या विषयावर वैद्यकीय महाविद्यालये, अशासकीय स्वयंसेवी संस्था तसेच खाजगी तज्ज्ञ डॉक्टर यांच्यामार्फत प्रतिबंधक उपचार केले जात आहेत.