सांगलीतील खूनप्रकरणी तरुणास आजन्म कारावास, उसने घेतलेले २ लाख मागितल्याने केला होता खून
By अशोक डोंबाळे | Updated: December 20, 2024 20:22 IST2024-12-20T20:22:40+5:302024-12-20T20:22:59+5:30
Sangli Crime News: उसने घेतलेले दोन लाख रुपये परत मागितल्याच्या रागातून खून करणाऱ्या तरुणास आजन्म कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. सरफराज ताजुद्दीन निपाणी (वय ३१, रा. साई सदन अपार्टमेंट, विश्रामबाग, सांगली) असे शिक्षा झालेल्या तरुणाचे नाव आहे.

सांगलीतील खूनप्रकरणी तरुणास आजन्म कारावास, उसने घेतलेले २ लाख मागितल्याने केला होता खून
- अशोक डोंबाळे
सांगली - उसने घेतलेले दोन लाख रुपये परत मागितल्याच्या रागातून खून करणाऱ्या तरुणास आजन्म कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. सरफराज ताजुद्दीन निपाणी (वय ३१, रा. साई सदन अपार्टमेंट, विश्रामबाग, सांगली) असे शिक्षा झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. के. शर्मा यांनी सदरची शिक्षा सुनावली. सदरची घटना ही दि. ०६ जून २०१८ रोजी घडली होती.
याबाबत अधिक माहिती, २०१७ मध्ये मयत प्रशांत सूर्यकांत पाटील यांच्याकडून संशयित सरफराज याने दोन लाख रुपये उसने घेतले होते. संशयित निपाणी याने उसने घेतलेले दोन लाख परत देण्याचे आश्वासन पाटील यांना दिले होते; परंतु वारंवार मागणी करूनही संशयित निपाणी याने पैसे परत दिले नाही. दि. ६ डिसेंबर २०१८ रोजी संशयित निपाणी याने प्रशांत पाटील यांच्या घरी जाऊन, मी सांगली सोडून मूळ गावी जत येथे जाणार असल्याचे सांगितले. त्यामुळे प्रशांत पाटील हे पत्नीसह दि. ६ रोजी सकाळी संशयिताच्या घरी गेले आणि त्याच्याकडे उसने दिलेले दोन लाखांची मागणी केली. यावरून संशयित सरफराज निपाणी आणि प्रशांत पाटील यांच्यात वादावादी झाली. चिडलेल्या सरफराज याने घरातील लोखंडी गज आणि कोयता घेऊन प्रशांत पाटील यांच्या डोक्यात वार केले. यामध्ये प्रशांत पाटील हे गंभीर जखमी झाले. भांडण सोडविण्यास प्रशांत यांच्या पत्नी मधे पडल्या असता, संशयित सरफराज याने त्यांना धमकावले. गंभीर दुखापत झाल्याने प्रशांत यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले; परंतु तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
याबाबत प्रशांत यांच्या पत्नी राजलक्ष्मी पाटील यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी संशयित प्रशांत पाटील याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला. सदर खटला सुनावणीस आला असता सरकारपक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासले. यामध्ये राजलक्ष्मी पाटील यांची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयापुढे आलेल्या साक्षी आणि पुरावे ग्राह्य धरून न्यायमूर्तींनी आजीवन सश्रम कारावास, पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने कारावासाची शिक्षा ठोठावली. सदरकामी कक्षातील पोलिस उपनिरीक्षक अशोक तुराई, पोलिस कर्मचारी वंदना मिसाळ, सनी मोहिते यांनी मदत केली.