अथणी : अथणी-हारुगिरी रस्त्यावर संकोणहट्टीजवळ असलेल्या एका फर्निचर दुकानासमोर चोरी करण्यास आलेल्या संशयित विकास शिवदास कोष्टी (वय १६, रा. अरळहटी, ता. अथणी) याला बेदम मारहाण करून खून केल्याची घटना उघडकीस आली. १ मे रोजी हुलागबाळी रस्त्यावर खून केल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरवून सहा जणांना अटक केली. इतर संशयित फरारी आहेत.खुनानंतर विकास कोष्टी याला पुरावा नष्ट करण्यासाठी अज्ञातस्थळी फेकून दिले होते. पोलिसांनी तपासानंतर संशयित आरोपी अब्दुलबारी अब्दुलरजाक मुल्ला (वय ३६), जुबेरअहमद महंमदअक्रम मौलवी (वय ३४), बिलालअहमद मुक्तारअहमद मौलवी (वय २५), हजरतबिलाली अहमदइसली नालबंद (वय २४), फय्युम मुसा नालबंद (वय २७), महेश संजय काळे (वय ३६, सर्व रा. अथणी) यांना अटक केली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. हा खून कशासाठी केला, यामागचा हेतू काय, याबाबत पोलिस कसून चौकशी करत आहे.सर्व संशयित आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना कोठडी देण्यात आली आहे. या खुनामागील सूत्रधार कोण आहे, याचा तपास पोलिस यंत्रणा करत आहे. जिल्हा पोलिस वरिष्ठ अधिकारी भीमाशंकर गोळे, अतिरिक्त पोलिसप्रमुख आर. बी. बसरगी, उपअधीक्षक प्रशांत मुन्नोळी, सीपीआय संतोष हळुर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जी. एस. उपाय, कुमार हडकर, मल्लिकार्जुन तळवार यांच्या पथकाने संशयितांना गजाआड केले आहे. सहायक फौजदार वाय. वाय. रामोजी, एम. बी. दोडमणी, एम. ए. पाटील, ए. ए. येरकर, एम. डी. हिरेमठ, सी. व्ही. गायकवाड, डी. वाय. मन्नापूर, जी. एस. डांगे आदींचा तपासात सहभाग होता.
चौकशीत खुनाचा झाला उलगडाचोरीच्या संशयाने विकास याला तीन दिवस डांबून मारहाण करीत असताना अज्ञात व्यक्तीने याची माहिती दिली. त्यानंतर नातेवाइकांनी पोलिसांशी संपर्क साधून तो नंबर पोलिसांना दिला. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर खुनाचा उलगडा झाला. सहा संशयित आरोपी सापडले असून, त्यांना अटक केली आहे. आणखीन सहा संशयित आरोपी फरारी असल्याची चर्चा आहे. यामध्ये परिसरातील बड्या नेत्यांचा हात असल्याची चर्चा आहे.