मिरज : मिरजेत यशोधन मोरेश्वर खाडिलकर (वय ३० रा. आठवले वाडा ब्राह्मणपुरी मिरज) या तरुणाने व्यवसायात कर्जबाजारी झाल्याने घरात गळफास लावून आत्महत्या केली. बेदाणा व इतर व्यवसायात ६० ते ७० लाखांचे नुकसान झाल्याने, व्यापारी पैशासाठी तगादा लावत असल्याने आत्महत्या करीत असल्याची यशोधन याने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. या घटनेमुळे ब्राह्मणपुरीत खळबळ उडाली होती.
यशोधन खाडिलकर याने गेल्या काही वर्षात पॅकिंग बाॅक्स बेदाणा यासह विविध व्यवसाय केले होते. मात्र सर्व व्यवसायात तोटा झाल्याने तो कर्जबाजारी हाेता. सुमारे ६० ते ७० लाखांचे कर्ज झाले होते. उमदी येथील बेदाणा व्यापाऱ्यासह मिरजेतील काही व्यापाऱ्यांनी यशोधन याच्याकडे पैशासाठी तगादा लावला हाेता. यामुळे तो विवंचनेत होता. मंगळवारी सकाळी त्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
चाैकट
चिठ्ठीतील तपशिलाची चाैकशी
अविवाहित यशोधन वृद्ध आई-वडिलांसोबत राहात होता. त्याच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली होती. आत्महत्या प्रकरणाची व मृत यशोधनच्या चिठ्ठीतील तपशिलाच्या चाैकशीनंतर संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.