यंदाही लाऊडस्पीकरला फाटा, बांधणार चार बंधारे!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2017 03:59 PM2017-08-08T15:59:21+5:302017-08-08T16:43:53+5:30

 गणरायाचे आगमन आणि विसर्जन पारंपरिक वाद्यांच्या गजरात व्हावे, तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यंदाही प्रयत्नशील आहेत. लाऊडस्पीकर मुक्तीतून जलयुक्त शिवाराकडे’ हा संकल्प त्यांनी कायम ठेवला आहे.

This year, the Dolby is in fork, four bunds to build! | यंदाही लाऊडस्पीकरला फाटा, बांधणार चार बंधारे!

यंदाही लाऊडस्पीकरला फाटा, बांधणार चार बंधारे!

Next

- सचिन लाड

सांगली, दि.8 -  गणरायाचे आगमन आणि विसर्जन पारंपरिक वाद्यांच्या गजरात व्हावे, तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यंदाही प्रयत्नशील आहेत. लाऊडस्पीकर मुक्तीतून जलयुक्त शिवाराकडे’ हा संकल्प त्यांनी कायम ठेवला आहे. लाऊडस्पीकरला फाटा देऊन बचत झालेल्या पैशातून यावर्षी जिल्ह्यात चार सिमेंट बंधारे साकारण्याचे नियोजन त्यांनी केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने  लाऊडस्पीकर यंत्रणेच्या आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन होऊ नये, यासाठी कडक निर्देश देऊनही त्याचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे पोलिसप्रमुख शिंदे यांनी गतवर्षी ‘नो लाऊडस्पीकर’चा इशारा देत प्रबोधन मोहीम हाती घेतली. गावोगावी गणेश मंडळांच्या पदाधिका-यांच्या बैठका घेतल्या. उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन करून लाऊडस्पीकरला फाटा दिल्याने बचत झालेली रक्कम बंधारे बांधण्यास देण्याचे आवाहन केले. त्याला गणेशमंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने सुमारे २७ लाखांची रक्कम या विधायक कामासाठी जमा झाली. यातून मल्लेवाडी (ता. मिरज) व मणेराजुरी (ता. तासगाव) येथे दोन बंधारे बांधण्यात आले. ‘सुखकर्ता’ व ‘दु:खहर्ता’ असे त्यांचे नामकरण केले गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बंधा-याची पाहणी करून कौतुक केले होते.
यंदाचा गणेशोत्सव पंधरा दिवसावर येऊन ठेपला आहे. उत्सव शांततेत पार पडावा, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस नेहमीच प्रयत्नशील असतात. पण पोलिसप्रमुख शिंदे यांनी ‘नो लाऊडस्पीकर’ची सुरू केलेली मोहीम यावर्षीही कायम ठेवली जाणार आहे. गणेश मंडळांच्या बैठका घेऊन डॉल्बीला फाटा देऊन त्यामधून जमा झालेली देणगी जलयुक्त शिवार योजनेस देण्याचे आवाहन केले जाणार आहे. दुर्गामाता, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवातही लाऊडस्पीकर न लावण्याचे आवाहन करून त्यामधून बचत झालेला रचनात्मक कामासाठी अर्थात पैसा बंधा-यांसाठी द्यावा, यासाठी मंडळांच्या पदाधिका-यांचे प्रबोधन केले जाणार आहे. या उत्सवांच्या माध्यमातून जमा होणा-या देणगीतून बांधण्यात येणा-या बंधा-यांना गणेश, दुर्गा, शिव, भीम अशी नावे देण्यात येणार आहेत.

लाऊडस्पीकरच्या दणक्याचे परिणाम...
- दणदणाटामुळे हृदयविकाराचा धक्का बसण्याचा धोका.
- पूर्ण बहिरेपणा किंवा कानावर विपरित परिणाम.
- कानठळ्या बसविणा-या आवाजामुळे रुग्णांना त्रास.
- लहान मुले, वृद्धांच्या हृदयास सर्वाधिक धोका.
- हाद-यानं इमारतीची भिंत कोसळण्याची, तावदानाच्या काचा फुटण्याची शक्यता.

आवाजाची मर्यादा..
ध्वनिप्रदूषण नियमानुसार आवाजाची मर्यादा ६५ डेसिबल आहे.  लाऊडस्पीकर किंवा ध्वनिवर्धकाच्या क्षेत्रात यापेक्षा जादा डेसिबलची नोंद यंत्रावर झाली, तर तो गुन्हा ठरतो. सांगलीत पोलिसांकडे ध्वनिमापनाची यंत्रे तपासणीसाठी उपलब्ध आहेत.

पाच वर्षे तुरुंगवास...
सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर  यंत्रणा लावून ध्वनिप्रदूषण केल्याचा गुन्हा पोलिसांकडून दाखल केला जातो. त्यावेळी ध्वनिमापन यंत्राने केलेल्या तपासणीचा दाखला देऊन आयोजकांसह लाऊडस्पीकर मालकाला न्यायालयाच्या कठड्यात उभे केले जाते. तिथे गुन्हा सिद्ध झाल्यास पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ नुसार पाच वर्षे तुरूंगवास आणि एक लाख रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. अशी शिक्षा झाल्यानंतरही गुन्हा केल्यास सात वर्षांपर्यंत तुरूंगवास होऊ शकतो.

पाच हजारावर मंडळे...
सांगली, मिरज व कुपवाड शहरात ८३५ सार्वजनिक गणेश मंडळे आहेत, तर जिल्ह्यातील ग्रामीण भागात चार हजार ५३४ मंडळे आहेत. ही संख्या केवळ नोंदणीकृत मंडळांची आहे. याशिवाय नोंदणी न केलेली अनेक मंडळे गल्लीबोळात आहेत.

सहा गुन्हे दाखल...
गतवर्षी लाऊडस्पीकर लावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सहा गुन्हे दाखल झाले आहेत. हे गुन्हे मिरज शहर व मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडले आहेत. मंडळाच्या पदािधकारी व लाऊडस्पीकर मालकांविरुद्ध दाखल असलेल्या या गुन्ह्यांचा तपास पूर्ण झाला आहे. सध्या ही प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत.

यावर्षी केवळ गणेशोत्सवातच नाही, तर दुर्गामाता, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरे करणा-या मंडळांनाही ‘लाऊडस्पीकरमुक्तीतून जलयुक्त शिवाराकडे’ या उपक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे. उत्सवाच्या माध्यमातून येणा-या देणगीतून चार बंधारे साकारण्याचे नियोजन आहे. लोकांच्या जीवनात आनंदा निर्माण करण्याचे काम व्हावे, अशी अपेक्षा आहे.
- दत्तात्रय शिंदे, जिल्हा पोलिसप्रमुख, सांगली.

Web Title: This year, the Dolby is in fork, four bunds to build!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.