उद्योजकता विकास केंद्रातून नव उद्योजकांची भरारी, सांगलीतील प्रशिक्षणार्थी महिलांनी बनवले मसाल्याचे ब्रॅंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 16:15 IST2025-04-02T16:10:21+5:302025-04-02T16:15:48+5:30

प्रसाद माळी सांगली : नवे उद्योजक तयार व्हावेत, महिला स्वबळावर आर्थिक सक्षम व्हाव्यात, या उद्देशाने सुक्ष्म, लघु आणि मध्यम ...

With the help of Entrepreneurship Development Center, women entrepreneurs from Sangli formed a spice band | उद्योजकता विकास केंद्रातून नव उद्योजकांची भरारी, सांगलीतील प्रशिक्षणार्थी महिलांनी बनवले मसाल्याचे ब्रॅंड

उद्योजकता विकास केंद्रातून नव उद्योजकांची भरारी, सांगलीतील प्रशिक्षणार्थी महिलांनी बनवले मसाल्याचे ब्रॅंड

प्रसाद माळी

सांगली : नवे उद्योजक तयार व्हावेत, महिला स्वबळावर आर्थिक सक्षम व्हाव्यात, या उद्देशाने सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय विविध उपक्रम जिल्ह्यात राबवित आहे. याच अनुषंगाने उद्योजकता विकास केंद्र सांगली जिल्हा कार्यालयाच्या वतीने नुकतेच मसाले उत्पादनाचे प्रशिक्षण वर्ग पार पडला. याद्वारे महिला आता स्वत: मसाले उत्पादन करून बाजारात विक्री करत आहेत. यासाठी त्यांनी स्वत:चा मसाल्याचा ब्रॅंड देखील निर्माण केला आहे.

सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र सांगली जिल्हा कार्यालयाच्या वतीने दि. १० फेब्रुवारी व २६ मार्च या कालावधीत मसाले उत्पादनाचे ४५ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात ३० महिला व पुरुषांनी सहभाग घेतला होता. विजयनगर, सांगली येथे हे प्रशिक्षण पार पडले. यामध्ये विविध मसाल्याचे प्रकार, मसाले कसे बनवायचे, त्यांचे आकर्षक पॅकेजिंग, मसाल्याची बाजारात विक्री कशी करावे, उत्पादनाचे मार्केटिंग, बाजारपेठांचा अभ्यास, उद्योग उभारणी या संदर्भातील माहिती देण्यात आली.

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे जिल्हा प्रकल्प अधिकारी किरण बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण घेण्यात आले. जिल्हा समन्वयक शिवाजी त्रिमुखे यांनी या प्रशिक्षणाचे संयोजन केले. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांनी प्रशिक्षण वर्गास भेट देऊन उद्योग अनुदान, प्रोत्साहन, सबसीडी, विविध योजनांविषयी माहिती दिली.

या प्रशिक्षणातून महिलांनी स्वत: मसाले तयार केले. त्यांनी ते स्वत: वापरले, आपल्या कुटुंबीय व शेजारच्यांना वापरायला दिले. जेव्हा त्यांना आपण बनवलेले मसाले दर्जेदार असल्याबाबत खात्री झाल्यावर त्यांनी शासनाची मानके पूर्ण करत आपले मसाल्याचे उत्पादन बाजारात आणले. यासाठी त्यांनी मसाल्याचे आकर्षक पॅकेट बनवून व स्वत:च्या नावाचा ब्रॅंड बनवून ते बाजारात विक्री करत आहे.

प्रशिक्षणार्थींनी बनवले मसाल्याचे ब्रॅंड

सविता चव्हाण, सांगली  (अनंत मसाले), अमृता चिप्परगे (जय मसाले), रेखा कांबळे (प्रांजली मसाले), अपर्णा कुरणे (अन्नपूर्णा मसाले), रेश्मा लोंढे (स्फुर्ती मसाले), सुचिता काळे (एस. के. मसाले), शुभांगी अजटराव (एस. ए. मसाले)

मला स्वत:चा उद्योग व्यवसाय करायचा होता. या बाबत उद्योग भवन कार्यालयातून महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने आयोजित मसाले उत्पादन प्रशिक्षणाची माहिती मिळाली. या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन मी स्वत: मसाल्याचे उत्पादन करून त्याची विक्री करत आहे. तसेच, स्वत:चा मसाल्याचा ब्रॅंड देखील निर्माण केला आहे. - अमृता चिप्परगे, सांगली.

Web Title: With the help of Entrepreneurship Development Center, women entrepreneurs from Sangli formed a spice band

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.