जिल्ह्याच्या राष्ट्रवादीत बदलाचे वारे, पंधरा दिवसांत नवी कार्यकारिणी

By अविनाश कोळी | Published: October 25, 2023 08:09 PM2023-10-25T20:09:17+5:302023-10-25T20:09:27+5:30

तालुक्यापासून जिल्हा स्तरापर्यंत सर्व पदाधिकारी बदलणार

Winds of change in district NCP, new executive in fifteen days | जिल्ह्याच्या राष्ट्रवादीत बदलाचे वारे, पंधरा दिवसांत नवी कार्यकारिणी

जिल्ह्याच्या राष्ट्रवादीत बदलाचे वारे, पंधरा दिवसांत नवी कार्यकारिणी

सांगली : राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी येत्या पंधरा दिवसांत बदलले जाणार आहेत. प्रदेश कार्यकारिणीने दिलेल्या सूचनेनुसार पक्षांतर्गत निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले की, राज्यभर पक्षांतर्गत निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यातही त्याप्रमाणे निवडीचा कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येईल. गावपातळीवरील प्रतिनिधींकडून तालुका स्तरावरील प्रतिनिधी निवडले जाणार आहेत. त्यातून जिल्हा स्तरावर सहा व राज्य स्तरावर ३ प्रतिनिधी निवडले जाणार आहेत. तालुक्याचे पदाधिकारी निवडल्यानंतर जिल्ह्याच्या कार्यकारिणीची निवड होईल. पक्षाने दिलेल्या निवड प्रक्रियेचे तंतोतंत पालन केले जाणार आहे. जिल्हा स्तरावर काम करू इच्छिणाऱ्यांनी जिल्हा कार्यालयाकडे त्यांची नावे द्यावीत. तालुका स्तरावर बैठका घेताना संबंधितांच्या नावांची चर्चा केली जाईल.

निवडीचा रीतसर कार्यक्रम येत्या आठवडाभरात जाहीर केला जाणार आहे. पंधरा दिवसांत नवीन कार्यकारिणी जाहीर होईल.
जिल्हा कार्यकारिणी निवडल्यानंतर महिला, युवा व अन्य सेलच्या निवडी केल्या जातील. हीच प्रक्रिया तालुका स्तरावरही राबविली जाईल. सांगलीची जिल्हा कार्यकारिणी २०१९ मध्ये निवडली होती. त्यानंतर आता पुन्हा नियमानुसार तीन वर्षांनी बदल होत आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक व सचिव बाळासाहेब पाटील यांची उपस्थिती होती.

पक्षाच्या क्रियाशील सभासदांनाच निवडीचा अधिकार आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात राष्ट्रवादीचे एकूण ५ हजार ३८० क्रियाशील सभासद आहेत, असे पाटील यांनी सांगितले.

Web Title: Winds of change in district NCP, new executive in fifteen days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.