नाठाळ नद्यांना भिंतीने वेसण बसेल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:26 IST2021-08-29T04:26:10+5:302021-08-29T04:26:10+5:30

फोटो २८०८२०२१ संतोष ०२ : डॉ. महेश गोगटे इंट्रो ... अमेरिकेत होंडुरासमध्ये १९९६ मध्ये ४८४ मीटर लांबीचा पूल होलुटेक ...

Will Nathal rivers be surrounded by a wall? | नाठाळ नद्यांना भिंतीने वेसण बसेल?

नाठाळ नद्यांना भिंतीने वेसण बसेल?

फोटो २८०८२०२१ संतोष ०२ : डॉ. महेश गोगटे

इंट्रो ...

अमेरिकेत होंडुरासमध्ये १९९६ मध्ये ४८४ मीटर लांबीचा पूल होलुटेक नदीवर बांधला गेला. १९९८च्या ऑक्टोबरमध्ये तुफानी पावसाने दे माय धरणी ठाय अवस्था केली. चार दिवसांत तब्बल ७५ इंच पाऊस झाला. प्रचंड महापुरानंतरही पूल मात्र सुरक्षित राहिला. धक्कादायक बाब ही होती की, नदीने संपूर्ण प्रवाहाचा मार्गच बदलला. पुलाच्या बाजूने ती वाहू लागली. पश्चिम महाराष्ट्र्रातील महापुरानंतर नद्यांना भिंती बांधण्याची चर्चा जोरात सुरू आहे. नद्यांच्या नाठाळपणाला अशी वेसण बसेल? होलुटेक नदीवरील पुलाचे उदाहरण केस स्टडी म्हणून अशा वेळी डोळ्यांसमोर ठेवायला हवे. शहरी पर्यावरण आणि वाराणशीमधील जलसंसाधने या विषयावर पीएच.डी. केलेले जपानच्या क्योतो विद्यापीठातील संशोधक डॉ. महेश गोगटे यांनी केलेले हे विवेचन.

गेल्या दोन-अडीचशे वर्षांत पुराकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलला आहे. ब्रिटिशांपूर्वी नद्या, उपनद्या, तलाव, नाले, ओहोळ, ओढे पुष्करणी, कुंड हे शहरांचे अविभाज्य भाग होते. गावे आर्द्र असायची. नद्या सातत्याने पात्र बदलतात याची जाणिव जनमानसात होती. शेतीची सुपीकता टिकविण्यासाठी पूर आवश्यकच आहे, ही नदी साक्षरताही होती. ब्रिटिशांनी जमीन आणि पाण्याला विभागणाऱ्या रेषांची आखणी केली. अधिक महसुलासाठी अधिक प्रदेश सत्तेखाली हवा होता, त्यासाठी शुष्क भूभाग आवश्यक होता. महापुरात सैन्याची गती मंदावते, रोगराई फैलावते. त्यामुळे नदीशेजारचा परिसर कोरडा ठेवण्यासाठी प्रयोग सुरू झाले. इंग्लंडमधील नद्यांवरील प्रयोग भारतातही झाले. नदी, नाले, तलावातील पाण्यापेक्षा नळाचे पाणी अधिक शुद्ध ही संकल्पना लोकांच्या गळी उतरविण्यात आली. मोजकेच नैसर्गिक स्रोत शिल्लक ठेवून इतर बुजविले जाऊ लागले. रस्ते, उद्यानांसाठी जागा उपलब्ध केली गेली. पावसाचे पाणी आणि सांडपाणी एकाच नलिकेतून नेण्यासारखे प्रयोग स्थानिकांचा विरोध डावलून राबविण्यात आले. स्वातंत्र्योत्तर काळातही हे प्रयोग थांबलेले नाहीत. त्याचा परिणाम पूरहानी वाढण्यात होत आहे.

जपानमध्ये वर्षभर कमी-अधिक पाऊस असतो. जपानी माणसाची वाटचाल पूर आणि पावसासोबतच सुरू असते. पण, त्यांनी ब्रिटिशांसारखे तंत्रज्ञान चालविले नाही. तलाव, कुंड, बुजविले, पण त्यावर बांधकामे उभी केली नाहीत. टोकीयो, ओसाका भागात जमिनीखाली नव्याने तलाव निर्माण केले. महापुराचे पाणी त्यात जाण्यासाठी मोठ्या बोगदेवजा गटारी बांधल्या. पुराचे पाणी शक्य तितक्या उशिरा पात्राबाहेर पडण्यासाठी व्यवस्था केल्या. काही ठिकाणी नद्यांना मुद्दाम उतार निर्माण केले. आता पूर येतात, पण जीवितहानी होत नाही. वित्तहानीही मर्यादित प्रमाणात होते. रेड, ब्ल्, व्हाईट रेषांच्या नियमांचे कठोर पालन केले जाते. १९६४ च्या ऑलम्पिकने जपानला धडा दिला. नद्यांच्या स्वच्छतेचे महत्त्व शिकविले. या ऑगस्टमध्ये जपानमध्येही प्रचंड पाऊस झाला. पश्चिमेकडील हिरोशिमा, नागासकी भागात मोठे पूर आले. क्युशू प्रांतातही प्रचंड पाऊस झाला. पण, नुकसान तुलनेने अत्यंत कमी झाले. जपानसाठी महापूर, चक्रीवादळे नवी नाहीत; पण त्यासोबत जगण्याचा पॅटर्न जपान्यांनी विकसित केला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात पूरनियंत्रणासाठी नदीकाठी भिंती बांधण्याचे नियोजन सुरू असले तरी हा प्रयोग कितपत व्यवहार्य ठरेल याचा अभ्यास आवश्यक आहे. परदेशात पॅरिससारख्या काही ठिकाणी भिंती बांधल्या आहेत, पण तेथील नद्यांची तुलना कृष्णा, कोयना, पंचगंगेसोबत होऊ शकत नाही. थोडे मोठे कालवे असेच त्यांचे वर्णन करावे लागेल. काही देशांत पूरकाळात नदीकडेला तात्पुरते स्ट्रक्चर उभे केले जातात. पूर संपल्यानंतर काढून घेतले जातात. नदीकाठी भिंत बांधली तर शहरातील सांडपाणी कसे जाणार यावरही विचार आवश्यक आहे. नद्यांना भिंती बांधण्याची संकल्पना जुनीच आहे. अमेरिका, चीनमध्ये तसे प्रयोगही झालेत; पण नंतर त्याचे दुष्परिणामही समोर आले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात असा प्रयोग करण्यापूर्वी छोट्या मॉडेलद्वारे अभ्यास आवश्यक आहे.

नदीच्या नाठाळपणाला वेसण घालण्याचे मानवी प्रयत्न नदीच कुचकामी ठरवते. यासाठी मध्य अमेरिकेतील होंडुरासमधील नदीचे उदाहरण सातत्याने दिले जाते. तेथे जपानी कंपनीच्या मदतीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने होलुटेक नदीवर ४८४ मीटर लांबीचा भक्कम पूल १९९६ मध्ये बांधला. १९९८ च्या ऑक्टोबरमध्ये सलग चार दिवस तब्बल ७५ इंच पाऊस झाला. सहा महिन्यांचा पाऊस चार दिवसांत पडला. होंडुरासमधील सर्रास पुलांची वाताहात झाली. हा एकमेव पूल पाय रोवून उभा राहिला. त्याला जोडणारे रस्ते वाहून गेले, पुलाला कोणताही धक्का बसला नाही. तो सुरक्षितच राहिला; पण धक्कादायक बाब अशी की, नदीने आपला मार्ग पूर्णत: बदलला. प्रचंड खर्चाचा पूल निरुपयोगी ठरला. नदी आपला मार्ग बदलू शकते याचा विचार डिझाईन आणि प्लॅनिंग विभागाने केलाच नव्हता! आपल्याकडे नदीवर भिंत बांधताना ही ‘केस स्टडी’ डोळ्यांसमोर ठेवायला हवी.

-----------

- डॉ. महेश गोगटे

( लेखक जपानस्थित क्योतो विद्यापीठात संशोधक आहेत. शहरी पर्यावरण आणि वाराणशीतील कुंड, तलाव, पुष्कणी या विषयावर पीएच.डी. केली आहे. वाराणशीतील त्यांचा अभ्यास अजूनही सुरूच आहे.)

(शब्दांकन : संतोष भिसे)

Web Title: Will Nathal rivers be surrounded by a wall?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.