पाण्याच्या टॅँकरवर जीपीएस यंत्रणा बसणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 11:02 IST2019-06-03T10:58:50+5:302019-06-03T11:02:43+5:30
जत तालुक्यात दिवसेंदिवस तीव्र उन्हाळ्याचे चटके जाणवू लागले आहेत. प्रशासनाने टंचाईग्रस्त गावात उपाययोजना सुरू केल्या आहेत. तालुक्यातील ९३ गावे व त्याखालील ६७२ वाड्या-वस्त्यांवर १०९ टँकरव्दारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. अशावेळी बोगस फेऱ्यांना चाप बसावा, यासाठी सर्व टँकरला जीपीएस सिस्टिम बसवण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

पाण्याच्या टॅँकरवर जीपीएस यंत्रणा बसणार का?
जत : जत तालुक्यात दिवसेंदिवस तीव्र उन्हाळ्याचे चटके जाणवू लागले आहेत. प्रशासनाने टंचाईग्रस्त गावात उपाययोजना सुरू केल्या आहेत. तालुक्यातील ९३ गावे व त्याखालील ६७२ वाड्या-वस्त्यांवर १०९ टँकरव्दारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. अशावेळी बोगस फेऱ्यांना चाप बसावा, यासाठी सर्व टँकरला जीपीएस सिस्टिम बसवण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
तालुक्यात मोठ्याप्रमाणात टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. परंतु मंजूर खेपांनुसार पाणी पुरवठा होत नाही. प्रत्यक्षात कमी खेपा टाकल्या जात आहेत. बिले मात्र सर्व खेपांची काढली जात आहेत. जनतेची व शासनाची फसवणूक करून टँकर मालक गब्बर होताना दिसत आहेत. टँकरमालकांच्या या खेळीमुळे जनतेचे पाण्यावाचून हाल होत आहेत.
जीपीएस यंत्रणा बसवल्यावर खासगी टँकरमालकांना पाण्याची चोरी अथवा अतिरिक्त फेऱ्या शासन दप्तरी दाखविता येणार नाहीत. त्यामुळे १०९ टँकरवर जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणी होत आहे.
पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे टँकरच्या हालचालींची नोंद जीपीएसच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. यासाठी विशेष कक्ष पंचायत समिती स्तरावर उभारण्याची गरज आहे. पाण्याचे टँकर वाडी-वस्तीवर किंवा मागणी असलेल्या ठिकाणी पोहोचत नाहीत, अशा तक्रारी होत आहेत.