घरी पैसे देत नसल्याच्या रागातून पत्नीचा पतीवर हल्ला, सांगलीतील घटना
By शरद जाधव | Updated: February 28, 2023 17:37 IST2023-02-28T17:36:26+5:302023-02-28T17:37:08+5:30
स्वयंपाकघरातील विळतीने केला हल्ला

घरी पैसे देत नसल्याच्या रागातून पत्नीचा पतीवर हल्ला, सांगलीतील घटना
सांगली : अनेक वेळा पती-पत्नीच्या भांडणांमध्ये पतीकडून पत्नीला मारहाण झाल्याचे आपण बघितले असेल, एैकले असेल. मात्र, सांगलीतील लक्ष्मीनगर परिसरात चक्क पत्नीचेच पतीवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. अन् त्याचे कारणही असे आहे की घरी पैसे देत नसल्याच्या रागातून हा हल्ला करण्यात आलाय.
रागातून पत्नीने पतीवर विळतीने हल्ला केला. याप्रकरणी अशोक श्रीधर भिरडे (रा. दडगे प्लॉट, जुना बुधगाव रस्ता, लक्ष्मीनगर, सांगली) यांनी पत्नी शोभा व भाचा किरण सुरेश माळी यांच्याविरोधात संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. रविवारी (दि. २६) हा प्रकार घडला.
शाेभा हिने पतीला ‘तू काय कामाचा नाहीस, घरी पैसे आणून देत नाहीस’ असे म्हणत शिवीगाळ केली. स्वयंपाकघरातील विळतीने कानावर व हातावर वार करून जखमी केले. भाचा किरणनेही लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.