संजयकाका सांगा कुणाचे?

By Admin | Updated: September 15, 2014 00:03 IST2014-09-14T23:07:15+5:302014-09-15T00:03:19+5:30

भूमिकेबाबत तर्कवितर्क : महायुतीत अस्वस्थता कायम

Who told Sanjaykaka? | संजयकाका सांगा कुणाचे?

संजयकाका सांगा कुणाचे?

अविनाश बाड - आटपाडी -‘पप्पा सांगा कुणाचे?’ या धर्तीवर आता येत्या विधानसभा निवडणुकीत खानापूर-आटपाडी मतदारसंघात ‘खासदार संजय पाटील नेमकी कुणाला मदत करणार?’ असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. खासदार पाटील आणि आमदार सदाशिवराव पाटील यांचे संबंध गृहमंत्री आर. आर. पाटील यांना खुपत आहेत, तर रासपचे प्रदेशाध्यक्ष गोपीचंद पडळकर यांना मदत करण्याची घोषणा खा. पाटील यांनीच जाहीर कार्यक्रमात केली आहे. त्यामुळे महायुतीची उमेदवारी शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी आमदार अनिल बाबर यांना मिळाली, तर संजयकाकांची नेमकी भूमिका काय असेल, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.
धनगाव येथून कृष्णा नदीतून थेट आटपाडी तालुक्यातील ५३ गावांना पिण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचे भूमिपूजन गृहमंत्री पाटील यांच्याहस्ते आटपाडीत करण्यात आले. या कार्यक्रमात गृहमंत्री पाटील यांनी, आमदार पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत संजय पाटील यांना मदत केल्याचा आरोप केला.
वास्तविक आमदार पाटील हे कॉँग्रेसचे. त्यांना गत निवडणुकीत विसापूर मंडलमधून संजयकाकांनी मदत केली होती. सध्या संजयकाका आणि आमदार पाटील अनेक कार्यक्रमात एकत्रित दिसत आहेत. याचा अर्थ येत्या विधानसभा निवडणुकीतही संजयकाकांची मदत आमदार पाटील यांनाच मिळणार, असा काढला जात आहे.
लोकसभेवेळी संजयकाकांचे ‘स्टार प्रचारक’ असलेले गोपीचंद पडळकर यांना महायुतीचे तिकीट मिळो अथवा न मिळो, पण त्यांची उमेदवारी नक्की असल्याचे संजयकाकांनी जाहीर कार्यक्रमातून सांगितले आहे. सध्या ते गावा-गावात सभा घेत आहेत. लोकसभा निवडणुकीत आटपाडीतील प्रचारसभेत पडळकर यांच्या एका कार्यकर्त्याने सभेत उठून संजयकाकांना, ‘विधानसभा निवडणुकीत तुम्ही विसापूरचे तेवढे बघा,’ असे सांगितले होते. त्यावर संजकाकांनी, ‘बघा, कशी बिनटाक्याची शस्त्रक्रिया करतो ते!’ असे सांगून मदत करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे संजयकाकांची मदत पडळकरांनाच मिळणार, असा दावा कार्यकर्ते आता करीत आहेत.
माजी आमदार अनिल बाबर यांचा शिवसेनेतील पक्षप्रवेश महायुतीच्या तिकिटासाठीच असल्याचा मानला जात आहे. त्यामुळे महायुतीचे तिकीट मिळाले तर त्यांच्या धनुष्य-बाणाला महायुतीचा धर्म म्हणून संजयकाकांच्या कमळाच्या सुगंधाची साथ मिळणार का, याबाबत चर्चा होत आहे. बाबर यांनी गेल्या निवडणुकीत बंडखोरी केली होती. तेव्हा आटपाडीच्या देशमुख गटासह सगळी राष्ट्रवादी त्यांच्यामागे होती. अपवाद फक्त त्यांच्यावर बंधुतुल्य प्रेम असणाऱ्या गृहमंत्री पाटील यांच्या विसापूर मंडलचा ठरला. तेथून कॉँग्रेसच्या सदाशिवराव पाटील यांना मताधिक्य मिळाले होते. अर्थात त्यामागे संजयकाका गटाची रसद आणि सदाशिवराव पाटील यांनी फोडलेली राष्ट्रवादीची मंडळी होती. आता महायुतीचे सगळे नेते बाबर यांच्या पाठीशी राहणार असतील तर त्याला संजयकाकांचा अपवाद असेल का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादीतून तिकीट मिळो अथवा न मिळो, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी गृहमंत्री पाटील यांच्या साक्षीने उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीच्या दोन्हीही मंत्र्यांनी देशमुख यांच्या उमेदवारीला अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शविला आहे. राजकीय पक्ष वेगवेगळे असले तरी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील आणि खा. संजय पाटील यांचे संबंध सर्वश्रुत आहेत. त्यामुळे जयंतरावांनी आग्रह केला तर देशमुखांना संजयकाकांची छुपी मदत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळेच संजयकाकांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संजयकाकांपुढे धर्मसंकट?
खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात तासगाव तालुक्यातील विसापूर मंडलचा समावेश आहे. या मंडलमध्ये गृहमंत्री आर. आर. पाटील आणि खा. संजय पाटील असे दोनच गट प्रभावी आहेत. खानापूर आणि आटपाडीतील मतांची विभागणी नेत्यांनी आपले गट निर्माण करून केली आहे. परिणामी विसापूर मंडलमधील मते निर्णायक ठरत आहेत. त्यामुळे खासदार पाटील यांचा विसापुरातील गट कोणाचे काम करणार याबद्दल कमालीची उत्सुकता आहे. आता सर्वच उमेदवारांचा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून संबंध लागल्याने त्यांच्यासमोर धर्मसंकट उभे राहणार आहे.

थेट मैदानातून

Web Title: Who told Sanjaykaka?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.