सांगलीची बाजार समिती कोणाची?
By Admin | Updated: August 10, 2015 00:52 IST2015-08-10T00:52:10+5:302015-08-10T00:52:10+5:30
आज फैसला : जयंतराव-पतंगरावांचा सामना

सांगलीची बाजार समिती कोणाची?
सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची उद्या (सोमवार) मतमोजणी होत असून, दुपारपर्यंत सर्व निकाल अपेक्षित आहेत. १९ जागांसाठी ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जत, कवठेमहांकाळ आणि मिरज तालुक्यात कार्यक्षेत्र असलेल्या या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. माजी मंत्री पतंगराव कदम व जयंत पाटील यांनी या निवडणुकीसाठी सर्वस्व पणाला लावले असून, यामुळे निम्म्या जिल्ह्याचे नेतेही निश्चित होण्याची शक्यता आहे .
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शनिवारी अत्यंत चुरशीने ९५.१५ टक्के मतदान झाले. उद्या सकाळी मिरज येथील शेतकरी भवनमध्ये सकाळी आठ वाजता मतमोजणीस प्रारंभ होत आहे. दुपारी चार वाजेपर्यंत सर्व निकाल अपेक्षित आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी व प्रांत हेमंत निकम यांनी दिली.
ही निवडणूक कॉँग्रेस आघाडीप्रणित वसंतदादा रयत पॅनेल व राष्ट्रवादीप्रणित शेतकरी सहकारी पॅनेलमध्ये झाली. काँग्रेसचे नेतृत्व पतंगराव कदम, तर राष्ट्रवादीचे नेतृत्व जयंत पाटील यांनी केले. दोघांनीही ग्रामीण भाग पिंजून काढला. वसंतदादा पॅनेलमध्ये जनसुराज्य, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना सहभागी असून, शेतकरी पॅनेलमध्ये राष्ट्रवादी, भाजप व मदन पाटील गट सहभागी झाला आहे. सुमारे तेराशे कोटींची उलाढाल असणाऱ्या या संस्थेचा ताबा घेण्यासाठी राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे.
सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती ही जिल्ह्यातील सर्वात मोठी संस्था आहे. मिरज, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यात याचा विस्तार आहे. या संस्थेवर तसे वसंतदादा घराण्याचेच ५६ वर्षे वर्चस्व होते. सुरुवातीला वसंतदादा पाटील, त्यानंतर विष्णुअण्णा व नंतर मदन पाटील गटाचीच सत्ता राहिली. याला अपवाद केवळ गतवेळची निवडणूक राहिली. २००८ च्या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलच्या झेंड्याखाली जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली माजी मंत्री अजितराव घोरपडे, संजयकाका पाटील, माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार संभाजी पवार हे एकत्रित आले. राष्ट्रवादी, भाजपच्या या पॅनेलला पतंगराव कदम गटाचीही साथ मिळाली. ही निवडणूक मदन पाटील विरुध्द सर्वजण अशी झाली. चुरशीच्या निवडणुकीनंतर या संस्थेत पहिल्यांदाच परिवर्तन घडून आले. मात्र या पॅनेलचा कालावधी पूर्ण होण्याआधीच संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्यात आला. गेल्या अडीच वर्षांपासून या संस्थेवर प्रशासक आहे. (प्रतिनिधी)
निवडून येणारा उमेदवार आमचा
या निवडणुकीत पहिल्यांदाच व्यापाऱ्यांच्या दोन जागांसाठी तेरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आजपर्यंतची ही विक्रमी संख्या आहे. निवडून येणारा आमचा प्रतिनिधी असेल, अशी माहिती चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष मनोहर सारडा यांनी दिली. व्यापाऱ्यांमध्ये राजकारण असू नये म्हणून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. मात्र त्यात अपयश आले. निवडणुकीनंतरही व्यापाऱ्यांमध्ये राजकारणाला थारा देण्यात येणार नाही. निवडून येणाऱ्या उमेदवारांनी सर्वच व्यापाऱ्यांचे प्रतिनिधीत्व कोणतेही राजकारण न करता करावे, असे चेंबरचे प्रयत्न असणार आहेत.
७० उमेदवार रिंगणात
१९ जागांसाठी ७० उमेदवार मैदानात असून, सोसायटी, व्यापारी, ग्रामपंचायत व हमाल तोलाईदार गटात सर्वाधिक उमेदवार आहेत. ग्रामपंचायतीच्या २ जागांसाठी १० उमेदवार, सोसायटी- ७ जागा २१ उमेदवार, महिला- २ जागा ४ उमेदवार, भटके विमुक्त- १ जागा २ उमेदवार, ओबीसी- १ जागा ५ उमेदवार, आर्थिक दुर्बल- १ जागा ४ उमेदवार, अनुसूचित जाती-जमाती- १ जागा ३ उमेदवार, व्यापारी- २ जागा १३ उमेदवार, प्रक्रिया- १ जागा ३ उमेदवार, तर हमाल-तोलाईदारच्या एका जागेसाठी ५ उमेदवार रिंंगणात आहेत.