देशातील ८४ हजार बुद्ध विहार कुठे गेले?, भीमराव आंबेडकरांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 13:55 IST2022-06-13T13:54:45+5:302022-06-13T13:55:15+5:30
बौद्ध ही आपली ओळख आहे ती आपल्या आचरणातूनही दिसली पाहिजे

देशातील ८४ हजार बुद्ध विहार कुठे गेले?, भीमराव आंबेडकरांचा सवाल
मिरज : देशात सध्या मंदिर व मशिदींचा वाद निर्माण करुन दंगली घडविल्या जात आहेत. हा वाद उकरणाऱ्यांनी सम्राट अशोक यांच्या काळातील देशातील ८४ हजार बुद्ध विहार कुठे गेले, याचे उत्तर द्यावे, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी केले.
मालगाव (ता. मिरज) येथे भारतीय बौद्ध महासभेच्या सांगली, मिरज व मालगाव शाखेच्यावतीने पुणे विभागीय समता सैनिक दलाचे अधिवेशन व बौद्ध धम्म परिषद पार पडली. यावेळी भीमराव आंबेडकर बोलत होते. ते म्हणाले की, २०२५ पर्यंत देशभरातील कोट्यवधी लोक बौद्ध धम्म स्वीकारणार असून त्यादृष्टीने भारतीय बौद्ध महासभा देशातील २२ राज्यात कार्यरत आहे. लवकरच ५० हजार समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पानिपत येथे होणार आहे. २०२५ पर्यंत १ लाख सैनिक तयार करण्याचे लक्ष दलाने ठेवले आहे. बौद्ध ही आपली ओळख आहे ती आपल्या आचरणातूनही दिसली पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी राष्ट्रीय सचिव एस. के. भंडारे, एस. एस. वानखडे, प्रदेशाध्यक्ष भिकाजी कांबळे, पी. एम. ढोबळे, मोहन सावंत, पूज्य भदंत बी सारिपुत्तजी व त्यांचा भिक्खू संघ आदी उपस्थित होते. कार्यक्रमात महासभेचे जिल्हाध्यक्ष रुपेश तामगावकर, स्वागताध्यक्ष प्रा. मिलिंद भंडारे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जितेंद्र कोलप यांनी सूत्रसंचालन केले, तर मधुकर शेसवरे यांनी आभार मानले.