गहू, हरभरा आता फक्त खाण्यापुरताच!
By Admin | Updated: November 12, 2014 23:26 IST2014-11-12T22:24:10+5:302014-11-12T23:26:53+5:30
मिरज पूर्वमधील स्थिती : क्षेत्रच घटले; ऊस, द्राक्षे, फळपिके, भाजीपाल्यास पसंती

गहू, हरभरा आता फक्त खाण्यापुरताच!
लिंगनूर : मिरज पूर्व भागातील बहुतांश गावात म्हैसाळ योजनेचे पाणी खळाळू लागल्याने व परिसरातील पाणीपातळीही वाढू लागल्याने आता हा भाग संपूर्ण बागायती होण्याच्या मार्गावर आहे. ऊस, द्राक्षे यांनी क्षेत्र व्यापून टाकले असताना आता गहू, हरभरा या रब्बी पिकाचे क्षेत्र दिवसेंदिवस घटू लागले आहे. त्यांची जागा ऊस, द्राक्षे व नगदी भाजीपाला फळपिके घेऊ लागली आहेत. त्यामुळे गहू, हरभरा आता फक्त खाण्यापुरताच पिकवायचा, या मानसिकतेत बरेच शेतकरी पोहोचले आहेत.
मिरज पूर्व भागात म्हैसाळ योजनेने या भागाचे नंदनवन केले आहे. दुष्काळ योजनेच्या पाण्यामुळे सह्य होत आहे. हिवाळ्यात रब्बी व उन्हाळ्यातही आवर्तनांचा लाभ बऱ्याच गावांना व शेती क्षेत्राला होऊ लागला आहे. यामुळे येथील शेती बागायती होत आहे. बागायती शेती करताना तुलनात्मक अभ्यास करून शेतकरी ऊस व द्राक्ष या पिकांनाच प्राधान्य देत असल्याने दरवर्षी या दोन्ही पिकांच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ होत आहे. द्राक्षपीक जोखमीचे असूनही द्राक्षे व बेदाण्याचे दर पाहता दराची लॉटरी लागल्यास मोठा नफा शक्य असतो, त्यामुळे जोखीम पत्करून द्राक्षलागणीत वाढ सुरूच आहे, तर रोगाची अत्यंत कमी जोखीम व अल्प व्यवस्थापनावर ऊसशेती फुलत आहे आणि २२०० चा समाधानकारक दर मिळू लागल्याने ऊसक्षेत्रात वाढ होत आहे.
या तुलनेत गव्हावर तांबेरा रोग येतो, गव्हाचा दरही २० ते २२ रुपये किलोपर्यंतच मिळतो त्यामुळे ५० हजारावर एकरी नफा मिळविणे मोठे जिकिरीचे होते. त्यामुळे गहू व हरभरा या पिकांचे क्षेत्र दिवसेंदिवस घटत चालले आहे. गहू, हरभऱ्याच्या तुलनेत मका पीक अद्याप काहीसे टिकून आहे. पण भविष्यात पाणी याजेनांची विश्वासार्हता व वितरण होत राहिल्यास या पिकांचीही जागा ऊस व द्राक्षे यासारखी पिकेच घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील गहू व हरभऱ्याचे क्षेत्र मिरज पूर्व भागातील बेडग, आरग, लिंगनूर, बेळंकी, खटाव, एरंडोली, शिपूर या परिसरात सरासरी १० ते २० टक्केच उरले आहे.
जानराववाडी, चाबूकस्वारवाडी, शिंदेवाडी, सलगरे या परिसरातील ज्या भागात म्हैसाळचे पाणी पोहोचण्यात अडचणी आहेत, अशा भागात काही प्रमाणात हे पीक पहावयास मिळत आहे. बाकी सर्व क्षेत्रांवर आता केवळ ऊस व द्राक्षपिकाचाच कब्जा आहे. (वार्ताहर)
मिरज पूर्व भागात बागायती शेतीत वाढ होत आहे. उसाला कमी जोखीम, कमी व्यवस्थापन व चांगल्या दरामुळे पसंती आहे. त्या तुलनेत गहू, हरभरा ही पिके दराचा अभ्यास करता कमी मिळकत देणारी आहेत. त्यामुळे आता शेतकरी केवळ घरचा गहू, हरभरा खायचा म्हणून १० ते २० गुंठेच पेरणी करून उत्पादन घेत आहेत. या परिस्थितीला नैसर्गिक स्थिती, दर, रोग व व्यवस्थापनातील तुलनात्मक स्थितीच कारणीभूत आहे.
- रूद्राप्पा कोथळे,
शेतकरी, संतोषवाडी (ता. मिरज)