'लाडक्या बहीण'वरुन घराघरांत भांडणे लावण्याचे पाप आम्ही करणार नाही, अंगणवाडी सेविकांचा सर्वेक्षणास नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 18:59 IST2025-08-30T18:57:14+5:302025-08-30T18:59:38+5:30
गावपातळीवर फेर सर्वेक्षणाचे काम करताना अडचणी येत असून, काम करणे अवघड

'लाडक्या बहीण'वरुन घराघरांत भांडणे लावण्याचे पाप आम्ही करणार नाही, अंगणवाडी सेविकांचा सर्वेक्षणास नकार
सांगली : लाडकी बहीण योजनेचे सर्वेक्षण करण्यास अंगणवाडी सेविकांनी नकार दिला आहे. त्यामुळे अंगणवाडी सुपरवायझर मदतीला घेऊन सर्वेक्षणाचे काम प्रशासनाने पुढे सुरू ठेवले आहे.
ही योजना अंगणवाडी सेविकांना मनस्ताप देणारी ठरल्याचे दिसत आहे. योजना सुरू होताना सरसकट फॉर्म भरा असे आदेश शासनाने दिले होते. तेच फॉर्म आता पुन्हा तपासून अपात्र लाभार्थी निश्चित करा असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे सेविकांनी हे काम करण्यास नकार दिला आहे. तशी निवेदने जिल्हाधिकारी, महिला व बालकल्याण अधिकारी यांना दिले आहे. फेरसर्वेक्षणाच्या कामास विरोध केला आहे.
गावपातळीवर फेर सर्वेक्षणाचे काम करताना अडचणी येत असून, काम करणे अवघड होत आहे अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. अनेक कुटुंबे स्वतंत्र राहत असली तरी, त्यांची शिधापत्रिका एकत्र आहे, त्यांना अपात्र कसे ठरवायचे असा प्रश्न सेविकापुढे आहे. गावपातळीवर या महिलांच्या नाराजीला सामोरे जाण्यास सेविका तयार नाहीत. सेविकांनी सर्वेक्षण करण्यास नकार दिल्याने प्रशासनाने सुपरवायझरना मदतीला घेऊन काम सुरू ठेवले आहे.
भांडणे लावण्यास सांगू नका
एका घरात दोनपेक्षा अधिक लाभार्थी असल्यास दोघींचेच लाभ सुरू ठेवावेत असे आदेश शासनाने दिले आहेत. घरातील कोणाचे लाभ सुरू ठेवायचे हे त्यांच्याकडूनच लिहून घ्या अशी सूचना शासनाने केली आहे. मात्र, यामुळे घराघरांत भांडणे पेटली आहेत. ही भांडणे लावण्याचे काम आम्ही करणार नाही, असे अंगणवाडी सेविकांनी स्पष्ट केले आहे.
लाडकी बहीण योजनेतील लाभार्थीच्या फेरसर्वेक्षणास आम्ही नकार दिला आहे. सध्याच्या कामांचा बोजा पाहता हे काम शक्य नसल्याचे संघटनेने शासनाला कळवले आहे. कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांना अपात्र ठरविण्याची कसरत सेविका करणार नाहीत. - रेखा पाटील, अंगणवाडी कर्मचारी महासभा
अपात्र लाभार्थी शोधण्याचे काम जिकिरीचे आहे. ते करणार नसल्याची आमची भूमिका आहे. अपात्र ठरलेल्या महिलेच्या नाराजीचा सामना अंगणवाडी सेविकांना करावा लागत आहे. त्यामुळे आम्ही काम थांबवले आहे. - शुभांगी कांबळे, अंगणवाडी कर्मचारी संघटना, महापालिका क्षेत्र