विटा : जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाची केवळ चर्चाच आहे. त्यांना नक्की कोठे व कोणत्या पक्षात जायचे आहे, हेच त्यांनी अजून निश्चित केले नाही. त्यांचे अजून इकडे-तिकडेच सुरू आहे. पण, काहीही झाले तरी जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाला माझा व आमदार सदाभाऊ खोत यांचा कडाडून विरोध राहील, असे सांगत जतचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या कथित भाजप प्रवेशाला विरोध केला.खानापूर येथे शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र मंजूर केल्याबद्दल विटा येथे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा भाजपच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर, डॉ. रवींद्र आरळी, पंकज दबडे उपस्थित होते. आमदार पडळकर म्हणाले, दोन विधानसभा निवडणुकीत मला खानापूर मधून लढता आले नाही. तरीही तुम्हाला निधी कमी पडणार नाही. मुख्यमंत्री फडणवीस आहेत. त्यामुळे खानापूर मतदारसंघासाठी वेगळा निधी आपण मंजूर करून आणू.
ब्रह्मानंद पडळकर म्हणाले, खानापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांना ताकद द्यायला पडळकर बंधू कमी पडणार नाहीत. इथे लोक भाजपची पदे घेतात, मात्र काम दुसऱ्याचे करतात. हे थांबवले पाहिजे. यावेळी प्रमोद भारते यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. यावेळी डॉ. रवींद्र आरळी, नीलेश पाटील, संदीप ठोंबरे, दाजी पवार, संतोष यादव, सचिन कदम, राहुल मंडले, माणिक शिंदे, सामराय तुंबगी, सुहास कुलकर्णी, करण जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. प्रथमेश साळुंखे यांनी आभार मानले.
मंत्रीपद हा नशिबाचा खेळ : सदाभाऊ खोतमाजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी आमदार गोपीचंद पडळकर हे जनतेतून आमदार होऊ शकतात, हे जतच्या जनतेने दाखवून दिले. मंत्रीपद हा नशिबाचा खेळ आहे. मात्र, समाजातील प्रत्येक घटकाच्या मनात पडळकर यांनी स्थान निर्माण केले असल्याचे खोत म्हणाले. पृथ्वीराज देशमुख यांनी भाजपची सत्ता नसताना ढाल बनून आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी पक्षासाठी काम केले. पडळकर हे संघर्ष करणारे आणि ऊर्जेने काम करणारे व्यक्तिमत्त्व आहे. जिल्ह्यात भाजप ताकदीने वाढवायची असल्याचे त्यांनी सांगितले.