पुनवत: चांदोली परिसरात असलेल्या कानसा नदीवरील कांडवन जलाशयात वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. जलाशयातील बोटिंग, डोंगरझाडीतून कोसळणारे धबधबे व निसर्ग सौंदर्य पाहून पर्यटक सुखावत आहेत.
शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. त्यामुळे वर्षभर पर्यटकांचा इकडे राबता असतो . चांदोली धरणाच्या परिसरात शाहूवाडी तालुक्यातील कानसा नदीवर कांडवण धरण आहे.
या धरणातील जलाशयामध्ये बोटिंगची सुविधा उपलब्ध आहे. सध्या वर्षा पर्यटनाचे दिवस असून येथे बोटिंग सुविधा सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील असंख्य पर्यटकांची पावले कांडवणकडे वळत आहेत.
येथे खुलावणारा निसर्ग, रम्य वनसंपदा ,डोंगर कपारीतून वाहणारे धबधबे आणि धरणातील अथांग जलाशय पाहून पर्यटक मनमुराद आनंद लुटत आहेत.
धरणातील जलाशयात पाणी तुडुंब असून त्यामध्ये बोटिंग सुरू आहे. जोराने कोसळणाऱ्या जलधारा अंगावर झेलत पर्यटक सुमारे दोन किलोमीटर आत जाऊन बोटिंगची सफर करत आहेत.
बोटिंग दरम्यान डोंगर कपारीतून कोसळणारे धबधबे नजरेस पडत आहेत. त्यामुळे पर्यटकांचा आनंद द्विगुणित होत आहे. वर्षभरात चांदोली आणि कांडवणला हजारो पर्यटक भेट देत असल्याने येथील स्थानिक लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.