टेंभू योजनेचे पाणी दुधेभावी तलावाकडे
By Admin | Updated: May 18, 2016 00:16 IST2016-05-17T23:57:36+5:302016-05-18T00:16:09+5:30
नागज परिसरात उत्साह : शेतकऱ्यांना फायदा
टेंभू योजनेचे पाणी दुधेभावी तलावाकडे
ढालगाव : टेंभू योजनेचे पाणी नागज ओढ्यातून पुढे दुधेभावी तलावाकडे गतीने मार्गस्थ झाले असून, त्यामुळे नागज, निमज, कदमवाडी, घोरपडी, शिंदेवाडी, चोरोची, जांभुळवाडी, ढोलेवाडी, चुडेखिंडी, दुधेभावी, ढालगाव, आदी गावांत उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.टेंभू उपसा सिंचन योजनेअंतर्गत कवठेमहांकाळ तालुक्यात पाणी सोडण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर तीन आठवडे यांनी पाणी बंद होते. त्यामुळे उद्घाटने झाली, पाणीपूजन झाले, मात्र पाणी कुठाय? असा सवाल शेतकऱ्यांकडून विचारला जाऊ लागल्याने चंद्रकांत हाक्के यांनी खा. संजय पाटील यांच्या माध्यमातून टेंभू योजनेचे अधिकारी गुणाले, प्रशांत कडूसकर यांच्यासोबत बैठक घेऊन नागजच्या ओढ्यात तातडीने पाणी सोडावे, अशी भूमिका घेतली. परंतु हे पाणी पाठीमागे सातारा, कराड, सांगोला तालुक्यात ज्या शेतकऱ्यांची पैसे भरले होते, त्यांना देण्यात आले होते.
ज्या शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरली होती, त्यांना पाणी देणे हे प्राधान्यक्रमाने गरजेचे होते. खासदार संजय पाटील यांनी सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगुल यांच्याशी चर्चा करून ढालगाव विभागात पिण्यासाठी पाणी देणे गरजेचे आहे, हे पटवून दिले. त्यानंतर सातारा जिल्ह्याची पिण्यासाठी पाणी देण्यास अडचण नाही, असे सांगितल्यानंतर टेंभूच्या अधिकाऱ्यांनी सांगलीच्या बैठकीनंतर गतीने यंत्रणा मार्गी लावली. पाणी पुन्हा कवठेमहांकाळ तालुक्याकडे मार्गस्थ केले. ते नागज येथील बेलवण ओढ्यातून नागज, निमज असे दुधेभावी तलावाच्या दिशेने मार्गस्थ झाले व गुरूवारपर्यंत ते दुधेभावी तलावात पोहोचले, असे चंद्रकांत हाक्के यांनी सांगितले.
ढालगावरून परिसरातील दहा गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर मिटेलच, परंतु काही गावे या पाण्याच्या पात्राशेजारी आहेत, येथील शेतीलाही पाणी मिळणार असल्याचे हाक्के म्हणाले. (वार्ताहर)