कौसेन मुल्लामिरज : हातात मावणारा फ्रिज, आणि तोदेखील फक्त १०० रुपयांत? चकित झालात ना? होय, हे खरे आहे. मिरज शहरात सध्या त्याची धडाक्यात विक्री सुरू असून लाहीलाही करणाऱ्या उन्हात त्यांना मागणीही मोठी आहे.मातीपासून बनवलेल्या या बाटल्यांकडे ग्राहक आकर्षित होत असून थंड पाण्यासाठी त्यांचा वापर होत आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा येथून काही विक्रेते या बाटल्या घेऊन मिरजेत आले आहेत. हातगाड्यावरून शहरभरात त्यांची विक्री सुरू आहे. थंड पाण्यासाठी मातीचे मडके सर्रास वापरले जाते. प्रवाशांसाठी मात्र पाण्याची प्लास्टिकची बाटली सोबत बाळगण्याशिवाय पर्याय नसतो. हॉटेल किंवा दुकानातून चढ्या दराने थंड पाण्याची बाटली खरेदी करावी लागते. शिवाय काही वेळातच त्यातील पाणी पुन्हा गरम बनते. यावर उपाय म्हणून मातीच्या बाटल्या लोकप्रिय ठरत आहेत. एका बाटलीत लिटरभर पाणी मावते. काही वेळातच ते मडक्याप्रमाणे गारही होते. शिवाय पुन्हापुन्हा पाणी भरुन बाटली घेऊन फिरता येते. त्याला प्लास्टिकचे टोपण बसवले आहे. बाटली वजनास हलकीबाटलीला मातीचा वास येत नाही. प्रवासात बाटली फुटणार नाही याची काळजी घेत ती पक्की भाजल्याचे जाणवते. मातीची असली, तरी वजनाला हलकी आहे. प्लास्टिक बाटलीप्रमाणे वापरून फेकावी लागत नाही, पुन्हा-पुन्हा वापरता येते.
Sangli: फक्त १०० रुपयांत घ्या हातात मावणारा फ्रीज!, मिरजेत धडाक्यात विक्री सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 17:36 IST