आटपाडीच्या शुक ओढ्यात पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 23:14 IST2019-04-03T23:13:56+5:302019-04-03T23:14:01+5:30
आटपाडी : ऐन उन्हाळ्यात प्रथमच आटपाडीचा शुक ओढा यंदा पाण्याने झुळूझुळू वाहू लागला आहे. यंदा वर्षभर आटपाडीकडे पर्जन्यराजाने पाठ ...

आटपाडीच्या शुक ओढ्यात पाणी
आटपाडी : ऐन उन्हाळ्यात प्रथमच आटपाडीचा शुक ओढा यंदा पाण्याने झुळूझुळू वाहू लागला आहे. यंदा वर्षभर आटपाडीकडे पर्जन्यराजाने पाठ फिरविली, मात्र टेंभू योजनेच्या कृपेने दुष्काळी आटपाडीत कृष्णामाई वाहू लागली आहे.
आटपाडी परिसरात रब्बी हंगामासाठी ओढ्याने याआधी टेंभूचे पाणी सोडण्यात आले होते; पण यंदा प्रथमच उन्हाळ्यात पाणी सोडल्याने शेतकऱ्यांसह आटपाडीकरांमध्ये उन्हाळ्यात वाहणारा ओढा पाहून समाधान व्यक्त केले जात आहे. आटपाडी तलावातून पाणीमळा बंधाऱ्याने देशमुखवाडी बंधाºयापर्यंत पाणी ओढ्याने सोडले आहे. पावसाअभावी आटपाडी तालावातील पाण्याने तळ गाठला होता. दि. १५ मार्च रोजी टेंभूचे पाणी तलावात आले. दि. २७ मार्चपर्यंत ३०९ दलघफू क्षमतेचा तलाव पूर्णपणे भरला. त्यानंतर हाके मळा बंधारा भरण्यात आला.
आटपाडी तलावातून सुमारे १० कि. मी. परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी थेट पाईपलाईन टाकून शेतीसाठी पाणी नेले आहे. या शेतकºयांनी १२ लाख रुपये पाणीपट्टी भरली आहे. खांजोडवाडीपर्यंतच्या ओढ्याकडेच्या शेतकºयांनी ९ लाख रुपये पाणीपट्टीसाठी पैसे गोळा केले आहेत. या पाण्यामुळे डाळिंबासह या शेतकºयांची पिके आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काहीअंशी सुटणार आहे.
आटपाडी तलावावर आटपाडीच्या सुमारे ३५ हजार लोकसंख्येसह माडगुळे ७ गावांची प्रादेशिक योजना आणि मापटेमळा गावची पाणी पुरवठा योजना आहे. आता आटपाडी तलाव भरल्याने या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उन्हाळ्यापुरता तरी मिटला आहे. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
पूर्ण क्षमतेने पाणी?
आटपाडी तालुक्यातील शेतकºयांना पाण्याची किंमत वेगळी सांगण्याची गरज नाही. त्यात शासनानेही ८१ टक्के वीज बिल भरण्याचा निर्णय झाला. त्यामुळे शेतकºयांना १७४५१ रुपये दलघफू दराने पाणी मिळत आहे. पाण्याचे पैसे शेतकरी आधी भरत आहेत. पण विजेअभावी टेंभू येथील ९ पैकी कधी ३, तर कधी ५ मोटारी चालू केल्या जातात. त्यामुळे पूर्ण क्षमतेने पाणी येत नाही.
हे व्हायला हवे
सध्या आटपाडीचा ओढा वाहत असताना ७ कि.मी. अंतरावरील विठलापूरचा ओढा कोरडा ठणठणीत आहे. या ओढ्याने कौठुळी-बोंबेवाडीपर्यंत माणगंगा नदीने टेंभूचे पाणी सोडता येते. पण अजून बिंबवडे तलावातच पाणी आलेले नाही. या परिसरातील सर्व गावे पाण्याची वाट पहात आहेत.