अनिलभाऊंच्या हालचालींवर ‘वॉच’

By Admin | Updated: July 7, 2014 00:34 IST2014-07-07T00:33:50+5:302014-07-07T00:34:14+5:30

चौरंगी लढत शक्य : अमरसिंह देशमुख, गोपीचंद पडळकरही उमेदवारीवर ठाम

'Watch' on the movement of Anilbhau | अनिलभाऊंच्या हालचालींवर ‘वॉच’

अनिलभाऊंच्या हालचालींवर ‘वॉच’


दिलीप मोहिते : विटा, खानापूर विधानसभा मतदारसंघात नेत्यांनी उमेदवारीवर डोळा ठेवून हालचाली गतिमान केल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार अनिल बाबर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा मतदारसंघात जोरात सुरू असतानाच त्यांच्या राजकीय हालचालींवर कॉँग्रेसचे विद्यमान आमदार सदाशिवराव पाटील यांनी बारीक लक्ष ठेवले आहे. त्यातच आटपाडीचे माजी जि. प. अध्यक्ष अमरसिंह देशमुख व रासपचे गोपीचंद पडळकर हेसुध्दा उमेदवारीवर ठाम असल्याने यावेळी मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, चौरंगी लढतीचे संकेत आहेत.
खानापूर मतदारसंघात खानापूर, आटपाडी तालुक्यांसह तासगाव तालुक्यातील विसापूर मंडलमधील २१ गावांचा समावेश आहे. बाबर यांची खानापूर तालुक्यात, तर माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख व अमरसिंह देशमुख यांच्या माध्यमातून आटपाडीत राष्ट्रवादीची ताकद आहे. विसापूर मंडलमध्ये गृहमंत्री आर. आर. पाटील समर्थकांची मोठी संख्या आहे. तरीही सदाशिवराव पाटील यांनी सलग दोन निवडणुकांत विजय मिळवून राष्ट्रवादीला धक्का दिला आहे.
आता बाबर यांच्यावर शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी कार्यकर्त्यांचा दबाव वाढत असल्याची चर्चा आहे. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास खानापूर तालुक्यात राष्ट्रवादीला दुसरा पर्याय शोधूनही सापडणार नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या रथाची चाके आपोआपच निखळून पडणार आहेत.
दुसरीकडे आटपाडीतील राष्ट्रवादीचे नेते राजेंद्रअण्णा देशमुख व त्यांचे बंधू अमरसिंह यांनी मात्र राष्ट्रवादीमधून बाहेर पडण्यास सध्या तरी रस घेतलेला दिसत नाही. मात्र, कॉँग्रेस व राष्ट्रवादीची युती होऊन खानापूरची जागा कॉँग्रेसला गेल्यास बंडखोरी करून व मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळाल्यास पक्षातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशमुख बंधू उमेदवारीवर आजही ठाम आहेत. राष्ट्रवादीच्या पक्षाध्यक्षांकडून त्यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील मिळाल्याचेही सांगितले जाते.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे खासदार संजय पाटील यांचे स्टार प्रचारक असलेले आटपाडीतील रासपचे प्रदेशाध्यक्ष गोपीचंद पडळकर यांनीही महायुतीतून विधानसभेच्या मैदानात उतरण्यासाठी रणशिंग फुंकले आहे. माजी आमदार अनिल बाबर यांनी शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळविली तरी पडळकर हेसुध्दा उमेदवारीवर ठाम राहणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे यावेळी चौरंगी लढतीचे संकेत मिळत आहेत.

Web Title: 'Watch' on the movement of Anilbhau

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.