वालचंद-एमटीईत पुन्हा वाद सुरू
By Admin | Updated: January 30, 2015 23:36 IST2015-01-30T23:32:08+5:302015-01-30T23:36:56+5:30
रखवालदारांना धक्काबुक्की : पोलिसांत तक्रार दाखल

वालचंद-एमटीईत पुन्हा वाद सुरू
सांगली : येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय व्यवस्थापन व महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी (एमटीई) यांच्यातील जागेचा वाद पुन्हा उफाळून आला आहे. एमटीईकडून महाविद्यालयाच्या जागेत नवीन शाळा बांधण्याचा प्रकल्प सुरु असून, यासाठी जागा पाहणी करण्याच्या कारणावरुन दोन्ही गटात वाद झाला. रखवालदारांना धक्काबुक्की झाली. त्यांच्या कार्यालयाची मोडतोड करण्यात आली. काल (गुरुवार) सायंकाळी व आज, शुक्रवार सकाळी सलग दोन दिवस हा प्रकार घडला.
एमटीईला नवीन प्राथमिक शाळा सुरु करण्यास मान्यता मिळाली आहे. शाळेची इमारत ते महाविद्यालयाच्या जागेत उभी करणार आहेत. यासाठी एमटीईचे पदाधिकारी, त्यांचे वकील व रखवालदार गुरुवारी सायंकाळी जागेची पाहणी करण्यास गेले होते. त्यावेळी महाविद्यालय व्यवस्थापन समिती व एमटीईत वाद झाला. तसेच एकमेकांना धक्काबुक्की करण्यात आली. हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले होते. पोलिसांनी दोन्ही गटास बोलावून ‘तुमच्याकडून कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य घडल्यास कडक कारवाई केली जाईल’, अशा नोटिसा दिल्या. त्यानंतर आज पुन्हा एमटीईचे पदाधिकारी जागा पाहण्यास गेल्याने तणाव निर्माण झाला होता. या वादात विद्यार्थीही सहभागी झाले होते. महाविद्यालयाचे दोन्ही बाजूचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. व्यवस्थापन समिती व एमटीईचे सुरक्षारक्षक समोरासमोर भिडले. एमटीईच्या सुरक्षा रक्षकांच्या कार्यालयाची मोडतोड करून फलक फाडण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले. (प्रतिनिधी)
वालचंद महाविद्यालय एमटीईच्या मालकीचे आहे. जागेचा हा जुना वाद आहे. विद्यार्थ्यांनी या वादात पडू नये. नवीन शाळा बांधण्यास मंजुरी मिळाली आहे. त्याचे नियोजन सुरु आहे. महाविद्यालयाची ९० एकर जागा आहे. तिथे शाळा बांधणार आहोत. यास व्यवस्थापन समिती जाणीवपूर्वक विरोध करीत आहे.
- प्रा. श्रीराम कानिटकर,
सचिव, एमटीई
दिवसभर बंदोबस्त
महाविद्यालयासमोर दिवसभर दोन पोलीस व्हॅन ठेवण्यात आल्या होत्या. पन्नासहून अधिक पोलीस बंदोबस्तासाठी तैनात केले होते. महाविद्यालयात येणाऱ्या व जाणाऱ्या प्रत्येकाची पोलीस चौकशी करीत होते. दोन्ही गटाने पोलिसांत तक्रारी केल्या असल्या तरी, रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा नोंद नव्हता. दरम्यान, महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे कायदेविषयक सल्लागार एन. व्ही. मराठे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.