सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवार, १५ रोजी मतदान होत आहे. मतदानासाठी पालिका प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज केली असून, तयारी पूर्ण झाली आहे. या निवडणुकीसाठी ५२७ मतदान केंद्र असून, एकूण १ हजार १४३ ईव्हीएम यंत्र मतदानासाठी उपलब्ध आहेत. सर्वच मतदान केंद्रांवर वीज, पाणी, स्वच्छतागृहासह विविध सोयीसुविधाही दिल्याचे आयुक्त सत्यम गांधी यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.महापालिकेच्या ७८ जागांसाठी ही निवडणूक होत असून, ३८१ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी १८ प्रभाग चारसदस्यीय, तर २ प्रभाग तीनसदस्यीय आहेत. या निवडणुकीसाठी २९०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ५२७ केंद्रांवर मतदान होणार असून, १ हजार १४३ बॅलेट युनिट, तर ५२७ कंट्रोल युनिट आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, ३ मतदार अधिकारी, एक शिपाई नियुक्त असेल. मतदान कर्मचाऱ्यांना दोनदा प्रशिक्षण देण्यात आले आहे. बुधवारी शासकीय गुदाम येथे या कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य व ईव्हीएमचे वाटप केले जाणार आहे. त्यांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी ७३ वाहनांची व्यवस्था केली आहे. पोलिस बंदोबस्तात मतदान साहित्य केंद्रांकडे रवाना होणार आहे.निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार २४,६४४ संभाव्य दुबार मतदारांपैकी २५६४ नावांची बीएलओमार्फत पडताळणी करून त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. मतदारांच्या सोयीसाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर ‘मतदार सुविधा’ उपलब्ध केल्याचेही गांधी यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त अश्विनी पाटील, स्मृती पाटील यांच्यासह निवडणूक अधिकारी उपस्थित होते.
९१ केंद्र त्रासदायकमहापालिकेसाठी ५२७ मतदान केंद्र असून, त्यातील ९१ केंद्र त्रासदायक आहेत. यात सांगली शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १५, विश्रामबाग १८, संजयनगर २१, मिरज शहर १९, महात्मा गांधी चौक १४, कुपवाड एमआयडीसी हद्दीतील चार मतदान केंद्राचा समावेश आहे. या सर्व केंद्रावर सीसीटीव्ही बसविण्याचे काम हाती घेतले आहे.
मतदारांसाठी आरोग्य सेवामतदानाच्या दिवशी मतदारांच्या आरोग्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दहा आरोग्य केंद्रांतर्गत बूथनिहाय तपासणीसाठी दोन सत्रांत कर्मचारी कार्यरत राहतील. शासकीय गुदाम, सांगली प्रसूतिगृह आणि मिरज प्रसूतिगृह येथे ३ रुग्णवाहिका व वैद्यकीय पथके सज्ज असतील.
स्ट्राँगरूमवर सीसीटीव्हीची नजरमिरजेतील शासकीय गुदामात स्ट्राँगरूम उभारण्यात आले असून, तिथे सशस्त्र पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. फायर अलार्म आणि पेस्ट कंट्रोल प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. स्ट्राँगरूमच्या बाहेर ५०, तर आतमध्ये १० ते १५ सीसीटीव्ही बसविण्यात आले असून, ते २४ तास सुरू आहेत.
एकाचवेळी सहा प्रभागांची मतमोजणीप्रशासनाने मतमोजणीची तयारी पूर्ण केली आहे. मिरज शासकीय गुदाम येथे शुक्रवारी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. सहा निवडणूक क्षेत्रीय कार्यालयनिहाय मतमोजणीची व्यवस्था केली आहे. एकावेळी सहा प्रभागांची १४ टेबलावर मतमोजणी होणार आहे. ज्या प्रभागाची मतमोजणी सुरू आहे, तेथील उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनाच प्रवेश दिला जाईल. उमेदवार व प्रतिनिधींना मोबाइल बंदी आहे. मोबाइल आढळल्यास गुन्हा दाखल केला जाईल. प्रभाग ६, ९, १४ व १६ या चार प्रभागांत तीन फेऱ्या, तर उर्वरित १६ प्रभागांत दोन फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे.
- एकूण प्रभाग : २०
- सदस्य संख्या : ७८
- एकूण मतदार : ४,५४,४३०
- पुरुष : २,२४,४८३
- महिला मतदार : २,२९,८६५
- इतर : ८२
Web Summary : Sangli-Miraj-Kupwad municipal elections on 15th with 527 polling centers. 78 seats, 381 candidates, and 4,54,430 voters. 91 centers identified as sensitive, under CCTV surveillance. Counting on Friday.
Web Summary : सांगली-मिराज-कुपवाड नगर निगम चुनाव 15 तारीख को, 527 मतदान केंद्र। 78 सीटें, 381 उम्मीदवार और 4,54,430 मतदाता। 91 केंद्र संवेदनशील, सीसीटीवी निगरानी में। मतगणना शुक्रवार को।