आदर्श केंद्रावर मतदारांचे जंगी स्वागत -: फुग्यांच्या सजावटीसह रांगोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 23:35 IST2019-10-21T23:32:22+5:302019-10-21T23:35:20+5:30
मतदान केंद्रावर रुग्णवाहिकादेखील तयार ठेवल्या होत्या. मतदान केंद्रांवर ज्या मतदार माता येतील, त्यांच्यासोबतच्या लहान मुलांसाठी पाळण्याची सोय होती.

पलूस येथील पंडित विष्णू दिगंबर पलूसकर विद्यामंदिर येथील आदर्श मतदान केंद्र सजविण्यात आले होते.
सांगली : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात आठ आदर्श मतदान केंद्रांवर मतदारांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. मतदारांचे स्वागत व केंद्राची सजावट यामुळे आदर्श मतदान केंद्रांनी लक्ष वेधून घेतले होते. रांगोळ्यांबरोबरच रंगीबेरंगी फुग्यांच्या कमानीही आकर्षक होत्या. इस्लामपूरसह अनेक आदर्श मतदान केंद्रांच्या बाहेरच सेल्फी पॉर्इंटची व्यवस्था प्रशासनाने केली होती. येथे अनेक मतदारांनी मतदानानंतर छायाचित्र काढून ते सोशल माध्यमातून प्रसिध्द केले.
आठ विधानसभा मतदारसंघात आदर्श मतदारसंघांची निर्मिती करण्यात आली होती. त्यानुसार मतदान केंद्रे आकर्षक रंगसंगती, तसेच नारळाच्या झावळ्या, फुग्यांनी सजविण्यात आली होती. मतदान केंद्राबाहेर सर्वांना आकर्षित करणारी व मतदानाचे आवाहन करणारी रांगोळी काढण्यात आली होती. ‘देश का महा त्योहार’असे लिहून लक्षवेधी रांगोळी काढली होती. सेल्फी पॉर्इंटची सोय करण्यात आली होती.
आदर्श मतदान केंद्रे...
मिरज : बापूजी साळुंखे महाविद्यालय, सांगली : राणी सरस्वती कन्या शाळा, इस्लामपूर: डांगे इंटरनॅशनल स्कूल इस्लामपूर, शिराळा : जिल्हा परिषद शाळा पाडळी, पलूस-कडेगाव : पंडित विष्णू दिगंबर पलूसकर विद्यामंदिर, पलूस, खानापूर : तलाठी कार्यालय विटा, तासगाव-कवठेमहांकाळ : चंपाबेन वाडीलाल ज्ञानमंदिर, तासगाव व जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा बेंद्री, जत : रामराव विद्यामंदिर हायस्कूल.
गरोदर मातांची आशा स्वयंसेविकांकडून काळजी
गरोदर माता मतदारांची दक्षता घेण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने आशा स्वयंसेविका आणि आरोग्य सेविकांची आरोग्य केंद्रांवर नियुक्ती केली होती. त्यांनी गरोदर महिला मतदारांना मतदानासाठी मदत केली. मतदान केंद्रावर रुग्णवाहिकादेखील तयार ठेवल्या होत्या. मतदान केंद्रांवर ज्या मतदार माता येतील, त्यांच्यासोबतच्या लहान मुलांसाठी पाळण्याची सोय होती.