विश्वेश्वरय्या : अभियंत्यांचे आयडॉल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:31 IST2021-09-15T04:31:43+5:302021-09-15T04:31:43+5:30
विश्वेश्वरय्या यांच्या कार्याला पुन्हा उजाळा मिळतो तो ‘अभियंतादिनी’च. अभियंत्यांनी केलेल्या कामांची लोकांना ओळख व्हावी, अभियंत्यांना लोकांशी संवाद साधण्याची संधी ...

विश्वेश्वरय्या : अभियंत्यांचे आयडॉल
विश्वेश्वरय्या यांच्या कार्याला पुन्हा उजाळा मिळतो तो ‘अभियंतादिनी’च. अभियंत्यांनी केलेल्या कामांची लोकांना ओळख व्हावी, अभियंत्यांना लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळावी, लोकांकडून त्यांना त्यांच्या कामाची शाबासकी मिळावी, या हेतूने ‘अभियंता दिन’ साजरा करून अभियंत्यांचा गौरवही केला जातो. विश्वेश्वरय्या यांनी दिलेल्या कानमंत्रानुसारच आजही अभियंत्यांचे कार्य चालू आहे. शेतीव्यावसायिक पद्धतीने केल्याने अधिक उत्पादन मिळू शकते, देशाच्या विकासाला चालना मिळू शकते, असा आत्मविश्वास शेतकऱ्यांमध्ये विश्वेश्वरय्या यांनीच जागविला. जेव्हा मोठ्या अभियांत्रिकी प्रकल्पांची उभारणी करण्याची योजना असे, त्यावेळी सर विश्वेश्वरय्या हे अभियांत्रिकीच्या पलीकडे जाऊन विचार करीत असत. प्रस्तावित प्रकल्प हा कसा जास्तीत-जास्त समाजोपयोगी ठरेल व आर्थिकदृष्ट्या परवडणारा असेल, याचा ते बारकाईने अभ्यास करीत असत. त्यांची धोरणे आणि त्यांनी उभारलेली धरणे, इमारती, पूल आजही आमच्यासाठी अभ्यासाचा विषय आहे.
भारत हा शेतीप्रधान देश असल्यामुळे शेतीचा विकास झाल्याशिवाय सर्वांगीण विकास होणार नाही, यावर त्यांचा विश्वास होता. याचमुळे त्यांनी अनेक कृषी विद्यालये सुरू केली. शेती ही केवळ पाऊस व नशिबावर अवलंबून ठेवणे योग्य नाही; तर ती शास्त्रीय आणि व्यावसायिक पद्धतीने करता येऊ शकते, त्यामुळे अधिक उत्पादन मिळू शकते, परिणामी देशाच्या विकासाला चालना मिळू शकते, असा आत्मविश्वास त्यांनी शेतकऱ्यांमध्ये जागविला. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी उच्च शिक्षण देणारी अनेक महाविद्यालये स्थापन केली, शिवाय म्हैसूर विद्यापीठाचीही मुहूर्तमेढ रोवली.
सर विश्वेश्वरय्या यांनी महात्मा गांधीजींच्या बरोबरीनेही हिरीरिने काम केले. काहीबाबतीत त्यांचे मत-मतांतरे असली तरी, ध्येय एकच होते, ते म्हणजे ‘राष्ट्रउभारणी.’ भारत हा खेड्यांनी बनलेला देश आहे. महाराष्ट्रातील मोठ्या धरणांचा पाया घालण्यातही त्यांचा मोलाचा वाटा आहे.