शरीरसौष्ठव स्पर्धेत विशाल कांबळे विजेता
By Admin | Updated: January 30, 2015 23:17 IST2015-01-30T22:29:54+5:302015-01-30T23:17:19+5:30
पाटगावला स्पर्धा : ‘कमांडो श्री’ पुरस्कार

शरीरसौष्ठव स्पर्धेत विशाल कांबळे विजेता
सोनी : पाटगाव (ता. मिरज) येथील जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत विशाल कांबळे ‘कमांडो श्री’चा मानकरी ठरला. प्रवीण निकम याने ‘बेस्ट पोझर’, तर विजय कुंभार याने ‘बेस्ट इंप्रुव्हर’चा किताब पटकावला. पाटगाव येथील कमांडो करिअर अॅकॅडमीमध्ये जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. खासदार संजय पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील, पेट्रोल पंप असोसिएशनचे अध्यक्ष अश्विन पाटील, माजी सभापती सुभाष पाटील, सोनीचे माजी सरपंच दिनकर पाटील यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ६० किलो वजनी गटात विजय कुंभार, ६० ते ६५ किलोमध्ये महंमद बेपारी, ६५ ते ७० किलोमध्ये रियाज पठाण, ७५ किलोमध्ये विशाल कांबळे, तसेच कमांडो ग्रुपमध्ये अक्षय पाटील हे मानकरी ठरले. सर्व विजेत्यांना मारुती शिंदे यांच्याहस्ते बक्षीस वितरण केले. पंच म्हणून रामकृष्ण चितळे, रवींद्र आरते, पियुष भाटे यांनी काम पाहिले.
यावेळी पाटगावचे उपसरपंच तुकाराम पाटील, अनिल पाटील, रवी मोरे, विजय गुरव, आप्पासाहेब पाटील, माजी सरपंच सुरेश मुळीक यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)