कुस्तीचा वारसा; विराजने राष्ट्रीय कुराश स्पर्धेत पटकावले कांस्य पदक, हिंदकेसरी गणपतराव आंदळकरांचा नातू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 17:10 IST2025-01-10T17:10:24+5:302025-01-10T17:10:44+5:30
सहदेव खोत पुनवत : पुनवत (ता. शिराळा) येथील विराज शंकर आंदळकर याने रायपूर छत्तीसगड येथे झालेल्या राष्ट्रीय कुराश स्पर्धेत ...

कुस्तीचा वारसा; विराजने राष्ट्रीय कुराश स्पर्धेत पटकावले कांस्य पदक, हिंदकेसरी गणपतराव आंदळकरांचा नातू
सहदेव खोत
पुनवत : पुनवत (ता. शिराळा) येथील विराज शंकर आंदळकर याने रायपूर छत्तीसगड येथे झालेल्या राष्ट्रीय कुराश स्पर्धेत कांस्य पदक पटकावत स्पर्धेत दमदार कामगिरी केली. विराज हा जागतिक दर्जाचे कुस्तीगीर, हिंदकेसरी, अर्जुनवीर गणपतराव आंदळकर यांचा नातू आहे. कुस्तीतील कुराश प्रकाराबरोबर तो मातीतील कुस्तीचाही सराव करतो. आंदळकरांचा कुस्तीचा वारसा पुढे चालवत असल्याचे त्याच्या यशाने अधोरेखित झाले आहे.
विराज हा येथील हिंदकेसरी गणपतराव आंदळकर विद्यालयाचा विद्यार्थी आहे. तो गेल्या काही काळापासून कुस्ती, ज्युदो, जलतरण, कुराश, अथलेटिक्स आदी खेळ प्रकारांमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. विशेषतः कुस्ती व कुराश स्पर्धेत तो राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत यशस्वी ठरला आहे. विराज याच्या घरामध्ये कुस्तीची परंपरा आहे. आजोबा हिंदकेसरी गणपतराव आंदळकर, मारुतीराव आंदळकर, भानुदास आंदळकर, रघुनाथ आंदळकर, चुलते अभिजीत आंदळकर, लालासाहेब आंदळकर, दत्तात्रय आंदळकर यांच्यानंतर कुस्तीचा वारसा पुढे चालवत आहे. तो एक चपळ कुस्तीगीर असून स्थानिक कुस्ती मैदानातही दमदार कामगिरी करत आहे.
राज्य कुराश स्पर्धेत अजिंक्य ठरल्यानंतर तो छत्तीसगड येथे राष्ट्रीय स्पर्धेत १४ वर्षांखालील ५५ किलोवरील गटात खेळला. त्यात त्याने कांस्यपदक जिंकत राष्ट्रीय पातळीवर लौकिक निर्माण केला. विराजचे आजोबा हिंदकेसरी आंदळकर यांनी देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्वल केले होते. त्यांच्या कुस्ती क्षेत्रातील कामगिरीची दखल भारत सरकारने त्यांना सर्वोच्च अर्जुन पुरस्कार बहाल केला होता. शिवाय महाराष्ट्र सरकारनेही अनेक पुरस्कार देऊन सन्मान केला. शिवाय त्यांच्या गौरवार्थ दिल्लीतील एका वसाहतीला 'गणपत आंदळकर ब्लाॅक' असे नाव देण्यात आले आहे.
लहानपणापासून कुस्तीची आवड
विराज सध्या सातवीत शिकत आहे. लहान वयात तो कुस्ती, कुराश तसेच अन्य क्रीडा प्रकारात आंदळकर घराण्याचा क्रीडा वारसा पुढे नेत आहे. विराज यास आतापर्यंतच्या क्रीडा वाटचालीसाठी राज्य कुराश संघटनेचे अध्यक्ष अंकुश नागर, सचिव शिवाजी साळुंखे, कुस्तीगीर राजू साळुंखे, दत्तात्रेय व्यवहारे, शरद अंदुरे, शिक्षण संस्थेचे सचिव दत्तात्रय आंदळकर मुख्याध्यापक अशोक पाटील, क्रीडाशिक्षक अरुण पाटील, संजय पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.