विलासराव जगताप आमदारकीच्या स्वप्नात
By Admin | Updated: July 8, 2014 00:49 IST2014-07-08T00:48:08+5:302014-07-08T00:49:41+5:30
प्रकाश शेंडगे : वरिष्ठांनी आपल्याशी चर्चा केल्याशिवाय कोणाचाही भाजप प्रवेश अशक्य

विलासराव जगताप आमदारकीच्या स्वप्नात
सांगली : अजितराव घोरपडेंच्या भाजप प्रवेशाबाबत पक्ष विचार करत असला, तरी विलासराव जगतापांविषयी अद्याप कोणतीही चर्चा नाही. काहीही निश्चित नसताना जगतापांनी स्वत:चा पक्षप्रवेश आणि उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांना आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत, अशी टीका भाजपचे आमदार प्रकाश शेंडगे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.
ते म्हणाले की, जत मतदारसंघात मी विद्यमान आमदार आहे. गोपीनाथ मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीवेळी सांगलीच्या सभेत माझ्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले होते. अशा परिस्थितीत पक्ष विद्यमान आमदारांना डावलून दुसऱ्या कोणाला उमेदवारी कशी देईल? मतदारसंघाची गरज आणि त्या व्यक्तीची क्षमता यांची तपासणी करूनच यापुढे भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. जत मतदारसंघापुरता विचार केल्यास, तेथे कोणत्या नेत्याला पक्षात घ्यायचे, याचा निर्णय माझ्याशी चर्चा केल्याशिवाय घेतला जाणार नाही, हे पक्षीय बैठकीतच ठरले आहे. त्यामुळे जगतापांनी याबाबतची घाई केली. घोरपडेंबाबत पक्ष विचार करीत असला, तरी जगतापांविषयी सध्या पक्षात कोणतीही चर्चा नाही.
ते म्हणाले की, जगताप यांनी गत निवडणुकीत अशीच घाई केली होती. राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविताना त्यांनी ‘अं हं! मीच आमदार’, अशा आशयाचे फलक झळकाविले होते. लोकांनी त्यांना स्पष्टपणे नाकारले. पुन्हा तशीच घाई ते करीत आहेत. पक्षाची उमेदवार निवडीची प्रक्रिया ठरलेली आहे. स्थानिक पातळीवर कोअर कमिटी याविषयीचा निर्णय घेईल. तो प्रस्ताव राज्यातील निवड समितीकडे जाईल. राज्यातून पुन्हा केंद्रीय समिती त्यावर शिक्कामोर्तब करेल.
माझी उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकारही मला नाही, मात्र गोपीनाथ मुंडे यांनी सांगलीतील जाहीर सभेतच माझी उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे त्यांच्या शब्दाला किंमत आहे. अशा परिस्थितीत जगतापांनी जरा सबुरीने घ्यावे, असा माझा त्यांना प्रेमाचा सल्ला आहे. (प्रतिनिधी)