Sangli: खंडेराजुरीत पशुवैद्यक तज्ज्ञाने संपवले जीवन, खासगी सावकारांच्या त्रासामुळे आत्महत्येची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 18:10 IST2025-04-02T18:10:14+5:302025-04-02T18:10:29+5:30
मिरज : खंडेराजुरी (ता. मिरज) येथे शुभम प्रकाश कोष्टी (वय २८) या पशुवैद्यक तज्ज्ञाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या ...

Sangli: खंडेराजुरीत पशुवैद्यक तज्ज्ञाने संपवले जीवन, खासगी सावकारांच्या त्रासामुळे आत्महत्येची तक्रार
मिरज : खंडेराजुरी (ता. मिरज) येथे शुभम प्रकाश कोष्टी (वय २८) या पशुवैद्यक तज्ज्ञाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. शुभम कोष्टी याने सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार त्याचा भाऊ शैलेश प्रकाश कोष्टी यांनी पोलिस ठाण्यात केली आहे.
शुभम कोष्टी याने दि. २८ मार्च रोजी घराच्या मागे शेतात विष प्राशन केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पशुवैद्यकीय काम करणाऱ्या शुभम यांनी गावात जनावरांचा मुक्त गोठा व डेअरी सुरू केली होती. यासाठी त्यांनी खंडेराजुरी व कुकटोळी येथील चार खाजगी सावकारांकडून चार लाख रुपये कर्ज दहा टक्के व्याजाने घेतले होते. या कर्जाची परतफेड केल्यानंतरही आणखी दहा लाख रुपये वसुलीसाठी शुभम यांना दमदाटी सुरू होती.
खासगी सावकारांच्या तगाद्याला कंटाळून भाऊ शुभम याने आत्महत्या केली व या खाजगी सावकारांना एक पोलिस कर्मचारीही मदत करीत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. भावाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या आदिनाथ चौगुले, सम्मेद चौगुले, दीपक रुपनर (सर्व रा. खंडेराजुरी) व बाळासो बंडगर (रा. कुकटोळी, ता. कवठेमहांकाळ) यांच्यावर कारवाईची मागणी शैलेश कोष्टी यांनी पोलिसात केली आहे. या तक्रारीबाबत चौकशी सुरू असल्याचे ग्रामीण पोलिस निरीक्षक अजित सिद यांनी सांगितले. मृत शुभम कोष्टी यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी असा परिवार आहे.