सांगली जिल्ह्यातील शिराळ्यात विषारी ‘पोवळा साप’ आढळला; सर्वात लहान विषारी सापांपैकी एक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 16:21 IST2025-10-13T16:21:26+5:302025-10-13T16:21:48+5:30
सुरक्षितरीत्या नैसर्गिक अधिवासात सोडले

सांगली जिल्ह्यातील शिराळ्यात विषारी ‘पोवळा साप’ आढळला; सर्वात लहान विषारी सापांपैकी एक
शिराळा (जि.सांगली) : शिराळा तालुक्यातील जैवविविधतेत नव्या प्रजातीची भर पडली आहे. येथील पंचायत समितीजवळील एका घराशेजारी दुर्मीळ स्लेंडर कोरल स्नेक आढळला. मराठीत तो पोवळा या नावाने ओळखला जातो. अतिशय क्वचित दिसणाऱ्या या विषारी सापाची नोंद शिराळ्यात प्रथमच झाली आहे.
‘प्लॅनेट अर्थ फाउंडेशन’चे कार्यकर्ते वैभव नायकवडी यांना हा साप आढळला. नायकवडी यांच्यासह समीर पिरजादे, अमित माने आणि प्रणव महाजन या कार्यकर्त्यांनी या सापाची ओळख पटवली. त्याला सुरक्षितरीत्या नैसर्गिक अधिवासात सोडले.
‘पोवळा’ हा भारतातील सर्वात लहान विषारी सापांपैकी एक असून, तो दुर्मीळ आहे. त्याची लांबी साधारणपणे ५० ते ९० सेंमीपर्यंत असते. त्याचे शरीर सडपातळ, तपकिरी रंगाचे, काळ्या डोक्यासह शेपटीजवळ काळ्या रिंग आणि दोन ठिपके असलेले असते.
तो साधारणत: जमिनीखालील ओल्या मातीत आणि पानांच्या ढिगाऱ्यात आढळतो. पोटाखालचा भाग तेजस्वी पोवळ्या रंगाचा असल्याने त्याला हे नाव प्राप्त झाले आहे. त्या रंगाला पारंपरिकरीत्या त्याच्या विषारी स्वभावाचे प्रतीक मानले जाते.