बोगस कागदपत्रांनी वाहन नोंदणीचा प्रयत्न

By Admin | Updated: September 16, 2014 23:25 IST2014-09-16T22:45:19+5:302014-09-16T23:25:32+5:30

एकावर गुन्हा : सांगलीतील घटना

Vehicle registration attempt by bogus documents | बोगस कागदपत्रांनी वाहन नोंदणीचा प्रयत्न

बोगस कागदपत्रांनी वाहन नोंदणीचा प्रयत्न

सांगली : बोगस कागदपत्रे देऊन अवजड मालवाहतूक वाहनांची नोंदणी झाल्याचा प्रकार सांगलीच्या उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) आज (मंगळवार) उघडकीस आला. याप्रकरणी नेमिनाथ भूपाल चौगुले (रा. कसबा-सांगाव, ता. कागल, जि. कोल्हापूर) याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमिनाथ चौगुले याचा अवजड मालवाहतूक वाहन चालविण्याचा व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी त्याने एक वाहन खरेदी केले आहे. हे वाहन स्वत:च्या नावावर करून घेण्यासाठी व वाहनांची नोंदणी करण्यासाठी तो १ सप्टेंबरला आरटीओ कार्यालयात गेला होता. त्याने वाहनाची सर्व कागदपत्रे दिली होती. अधिकाऱ्यांनी या कागदपत्रांची तपासणी केली. त्यावेळी चौगुले याने पूर्वी विकलेल्या वाहनाचा चेस व इंजिन नंबर नोंदणी करायला कागदपत्र आणलेल्या वाहनास देऊन ते वाहन नवीन असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले होते.
अधिकाऱ्यांनी हा प्रकार आरटीओ हरिश्चंद्र गडसिंग यांना सांगितला होता. गडसिंग यांनी या प्रकरणाची सर्व कागदपत्रे ताब्यात घेऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. चौकशीत चौगुलेने आरटीओ कार्यालयास फसविण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले.
त्यानंतर गडसिंग यांनी जिल्हा सरकारी वकिलांचे मत घेऊन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक रजनीकांत पाटील यांनी मंगळवारी सायंकाळी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दाखल केली. चौगुलेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Vehicle registration attempt by bogus documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.