वीर सिंदूर लक्ष्मण स्मृतिशताब्दी वर्ष साजरे करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:18 IST2021-06-27T04:18:39+5:302021-06-27T04:18:39+5:30
सांगली : क्रांतिवीर सिंदूर लक्ष्मण यांच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय शनिवारी विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या बैठकीत ...

वीर सिंदूर लक्ष्मण स्मृतिशताब्दी वर्ष साजरे करणार
सांगली : क्रांतिवीर सिंदूर लक्ष्मण यांच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय शनिवारी विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या बैठकीत घेण्यात आला.
सांगली येथील कष्टकऱ्यांची दौलत सभागृहात राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त तसेच वीर सिंदूर लक्ष्मण यांच्या शहीद शताब्दी वर्षाच्या निमित्ताने विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. विजयकुमार जोखे होते. बैठकीस ॲड. के. डी. शिंदे, विकास मगदूम, विद्याताई स्वामी, प्रा. दादासाहेब ढेरे, ॲड. कृष्णा पाटील, प्रा. वासुदेव गुरव, डॉ. संजय पाटील, ज्योती आदाटे, कॉ. मारुती शिरतोडे, बाळासाहेब पाटील, आदी उपस्थित होते.
कॉ. धनाजी गुरव व प्रा. गौतम काटकर यांनी यंदा ब्रिटिशांविरोधात लढा देणाऱ्या वीर सिंदूर लक्ष्मण यांचे स्मृती शताब्दी वर्ष असल्याची माहिती दिली. त्यामुळे जिल्ह्यात वर्षभर विविध कार्यक्रम साजरे करण्याची भूमिका मांडली. बैठकीत येत्या १५ जुलै रोजी सिंदूर लक्ष्मण यांचे जन्मगाव असलेल्या सिंदूर (ता. जत) येथे अभिवादन करून स्मृतिशताब्दी वर्षाची सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी क्रांतिवीरांच्या कुटुंबीयांचा सन्मान, त्यांची लोकगीते अजरामर करणारे लोककलावंत व नाटककारांचा सन्मान करण्याचे निश्चित करण्यात आले.
सिंदूर (ता. जत) येथे व नागराळ (जि. बागलकोट) येथील बलिदान स्थळास अभिवादन, जिल्ह्यात विविध परिसंवाद व चर्चासत्रे, सिंदूर लक्ष्मण यांच्या कार्यावर पुस्तिका प्रकाशन, कलावंताचा मेळावा घेण्याचे ठरविण्यात आले. सांगली जेल फोडोचा शौर्य दिन २४ जुलैला साजरा करण्याचेही निश्चित करण्यात आले. बैठकीस बाबूराव जाधव, प्रा. मिलिंद साळवी, सागर माळी, मानसिंग सोरटे, रघुवीर अथणीकर, रोहित शिंदे, हिंमत मलमे, सुधीर नलवडे, आदी उपस्थित होते.