Sangli: वसगडे रेल्वे उड्डाणपूल अखेर खुला, स्थानिक नेत्यांत श्रेयवाद रंगला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 17:14 IST2025-10-28T17:14:14+5:302025-10-28T17:14:46+5:30
कृती समितीच्या पाठपुराव्याला यश

Sangli: वसगडे रेल्वे उड्डाणपूल अखेर खुला, स्थानिक नेत्यांत श्रेयवाद रंगला
सांगली : सांगली-पलूस मार्गावरील वसगडे येथील रेल्वे उड्डाणपुलावरून वर्षभरापासून राजकारण रंगले होते. हा पूल तयार होऊनही वाहतुकीसाठी खुला करण्यात येत नव्हता. कधी उद्घाटनाच्या नावाखाली तर कधी कामे अपूर्ण असल्याचे कारण देत पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात येत नव्हता. या पुलासाठी नागरिक जागृती मंच व कृती समितीने सातत्याने पाठपुरावा केला. रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहारही केला. अखेर सोमवारी हा पूल वाहतुकीसाठी खुला झाला. त्यात पुलाच्या उद्घाटनावरून भाजप व काँग्रेस पक्षात श्रेयवाद रंगल्याचेही दिसून आले.
अडीच वर्षापूर्वी वसगडे येथे रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू झाले. दीड वर्षात काम पूर्ण होऊन पूल तयार झाला. पण त्याचे लोकार्पण होत नव्हते. ऑगस्ट महिन्यात सर्वपक्षीय कृती समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पूल वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी केली. कृती समितीची तक्रार सोशल माध्यमातून फिरताच मुख्यमंत्र्यांनीही तातडीने आदेश दिले आणि पूल वाहतुकीसाठी खुला झाला. पण चोवीस तासातच पुन्हा हा पूल रेल्वे प्रशासनाने बंद केला.
त्यानंतर नवरात्रीमध्ये या पुलाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत व्हिडीओ काॅन्फरन्सद्वारे करण्यात येणार असल्याचे पत्रच रेल्वे प्रशासनाने कृती समितीला दिले. पण दसऱ्यापर्यंत पुलाचे लोकार्पण झाले नाही. त्यानंतर दिवाळीचा मुहूर्त ठरला. पण हा मुहूर्तही हुकला. यावरून कृती समिती व नागरिक जागृती मंचाने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हा पुल स्थलांतरित करावा, अशी उपरोधिक मागणी केली होती. कडेगाव येथील आमसभेतही पुलाचा प्रश्न उपस्थित झाला होता. तेव्हा आमदार विश्वजित कदम यांनी लवकरच पुलाचे लोकार्पण होईल, असे आश्वासन दिले होते.
अखेर सोमवारी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. यावेळी कृती समितीचे सतीश साखळकर, महेश खराडे, शंभोराज काटकर, गजानन साळुंखे यांच्यासह सदस्य उपस्थित होते.
भाजप-काँग्रेसचे दावे प्रतिदावे
दरम्यान, पुलाच्या कामावरून भाजप-काँग्रेसमध्ये श्रेयवाद उफाळून आला. खासदार विशाल पाटील व आमदार विश्वजित कदम, महेंद्र लाड, अमोल पाटील यांच्याहस्ते नारळ फोडून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुलाचे लोकार्पण केले. तत्पूर्वी भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांच्या समर्थकांनी पुलावरील अडथळे दूर करून वाहतुकीसाठी खुला केला. दोन्ही पक्षाकडून पुलाबाबत दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत.
आता अंडरपास, सेवा रस्ता व्हावा
वसगडे उड्डाणपुल सुरू झाला असला तरी सेवा रस्त्याची दुरवस्था आहे. सेवा रस्त्यावर मोठमोठे खड्डे आहेत. हा रस्ताही काँक्रीटचा होणार आहे. त्याचे काम तातडीने सुरू व्हावे. तसेच स्थानिक शेतकऱ्यांसाठी अंडरपासचे कामही रेल्वे प्रशासनाने तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी कृती समितीचे सतीश साखळकर यांनी केली.