Sangli: खुला केलेला वसगडेचा पूल चोवीस तासात झाला बंद, राजकीय श्रेयवादाचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 19:18 IST2025-08-13T19:17:56+5:302025-08-13T19:18:26+5:30
तक्रारदार कार्यकर्ते, नागरिकांतून नाराजी

Sangli: खुला केलेला वसगडेचा पूल चोवीस तासात झाला बंद, राजकीय श्रेयवादाचा संशय
सांगली : वसगडे ते पाचवा मैलदरम्यान रेल्वे रुळावर उभारण्यात आलेला उड्डाणपूल सर्वपक्षीय कृती समितीच्या तक्रारीनंतर सोमवारी खुला करण्यात आला होता. वाहनधारकांचा हा आनंद मात्र चोवीस तासच राहिला. मंगळवारी अचानक पुन्हा बॅरिकेटस् लावून हा पूल बंद करण्यात आल्याने तक्रारदार कार्यकर्ते व नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
पुलाचे काम अडीच वर्षांपासून सुरू होते. काही दिवसांपूर्वीच काम पूर्ण झाले होते. मात्र, पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येत नव्हता. यावर सर्वपक्षीय कृती समितीने आवाज उठवत आंदोलनाचा इशारा दिला आणि मुख्यमंत्री कार्यालयाच्या वॉर रूमने तत्काळ दखल घेतल्यानंतर पूल खुला करण्यात आला होता.
मात्र, नागरिकांना दिलासा मिळण्याआधीच केवळ २४ तासांतच हा पूल पुन्हा बंद करण्यात आल्याने परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि कृती समितीच्या सदस्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. राजकीय श्रेयवादामुळे पूल बंद केल्याचे आरोप होत असून लोकांच्या हिताचा प्रश्न असेल तर त्यावर राजकारण कशासाठी, असा सवाल कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
नांद्रे ते पलूस या मार्गावर रेल्वे क्रॉसिंगच्या अडथळ्यामुळे गेली अनेक वर्षे वाहतूक विस्कळीत होती. उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊनही बॅरिकेट्स लावून पूल बंद ठेवण्यात येत होता. सोमवारी कृती समितीचे निमंत्रक सतीश साखळकर यांनी यासंदर्भातील फोटो समाजमाध्यमांवर शेअर करत २० ऑगस्टपर्यंत पूल न उघडल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वॉर रूमने दखल घेतली आणि सोमवारी दुपारी पूल खुला करण्यात आला. पण, मंगळवारीच पुन्हा पूल बंद झाल्याने संताप व्यक्त होत आहे.
पूल खुला होण्याचे श्रेय सामाजिक संघटनांना मिळू नये, असा राजकीय डाव यामागे दिसतो. आम्ही या निर्णयाबद्दल शासनाचे कौतुक केले होते. ज्यांना श्रेय घ्यायचे त्यांनी घ्यावे, पण पूल सुरु करावा, अशी आमची इच्छा आहे. - सतीश साखळकर, निमंत्रक, सर्वपक्षीय कृती समिती