Varunaraja's Chukwacha in Ghatandre area | घाटनांद्रे परिसरामध्ये वरुणराजाचा चकवाच

घाटनांद्रे परिसरामध्ये वरुणराजाचा चकवाच

ठळक मुद्देघाटनांद्रे परिसरामध्ये वरुणराजाचा चकवाच ओढे, नाले, बंधारे तलाव कोरडे ठणठणीत

जालिंदर शिंदे 

घाटनांद्रे : कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटमाथा परिसरात पावसाने धुमाकूळ घातला असला तरी, घाटनांद्रे गावाला मात्र पावसाने चकवा दिला आहे. येथे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून ओढे, नाले, बंधारे तलाव कोरडे ठणठणीत आहेत.

शेतीसाठी पाण्याचे टॅँकर सुरू आहेत. पाऊस नसल्याने माळावर गवत उगवलेले नाही. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे.

घाटनांद्रे हे कवठेमहांकाळ तालुक्यातील शेवटचे घाटमाथ्यावरील गाव आहे. या भागात चार वर्षांपासून एकही दमदार पाऊस झालेला नाही. सततच्या दुष्काळाने भूजल पातळी खालावली आहे. या पट्ट्यात नगदी पीक म्हणून द्राक्ष उत्पादनाला पोषक वातावरण आहे. त्यामुळे द्राक्षबागांचे क्षेत्र वाढले. तेही पाण्याविना संकटात आले आहे. टॅँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्याचा दरही अवाच्या सवा आहे. पिण्यासाठीही पाणी चढ्या भावाने विकत घ्यावे लागत आहे.

पावसाने हुलकावणी दिल्याने खरिपाचा पेराही हाती लागण्याची शक्यता धूसर झाली आहे. शेतातील पीक थांबल्याने शेतीवर आधारित इतर व्यवसाय, त्याचबरोबर पशुधन, दुग्ध व्यवसाय हेही संकटात आले आहे. त्यामुळे बळीराजाचे अर्थकारण कोलमडले आहे.

परतीच्या पावसाने घाटमाथ्यावरील इतर गावांना चांगलाच आधार दिला आहे. परंतु घाटनांद्रे परिसराला चकवा दिला आहे. त्यामुळे बळीराजा हतबल व चिंताग्रस्त बनला असून, त्याचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.

अशा दुष्काळजन्य परिस्थितीत बळीराजाला एक टॅँकर एक हजार रूपयांना, एक बॅरेल (१०० लिटर) पाचशे रूपयांना विकत घ्यावा लागत आहे. तसेच शुध्द पिण्याचे पाणी २० लिटरचा एक जार ३० रुपये याप्रमाणे घेण्यावाचून पर्याय राहिलेला नाही.

घाटमाथ्याला वरदान ठरणाऱ्या टेंभू योजनेंतर्गत असणाऱ्या घाटनांद्रे उपसा जलसिंचन योजनेचे काम गेली अनेक वर्षे रखडले आहे. त्यामुळे निसर्गाची वक्रदृष्टी, तर शासनाची दिरंगाई, अशा कात्रीत शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.

Web Title: Varunaraja's Chukwacha in Ghatandre area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.