Sangli: वैष्णवी शिंदे उत्कृष्ट ड्रोन पायलट, प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती भवनमध्ये होणार सन्मान; देशातील चार महिलांची निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 13:51 IST2025-01-20T13:48:07+5:302025-01-20T13:51:08+5:30
देशातील चार महिलांची निवड : सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव

Sangli: वैष्णवी शिंदे उत्कृष्ट ड्रोन पायलट, प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती भवनमध्ये होणार सन्मान; देशातील चार महिलांची निवड
देवराष्ट्रे : मोहित्यांचे वडगाव (ता. कडेगाव) येथील वैष्णवी परशुराम शिंदे यांनी उत्कृष्ट ड्रोन पायलट म्हणून काम केल्याबद्दल प्रजासत्ताकदिनी राष्ट्रपती भवन दिल्ली येथे त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यासाठी त्यांना राष्ट्रपती भवन यांच्याकडून आमंत्रण पत्रिका प्राप्त झाली आहे. यासाठी देशातील चार महिलांची निवड करण्यात आली आहे.
पंतप्रधान मिनी ड्रोन योजना खास महिलांसाठी शासनाने राबविली होती. या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील १५ महिलांनी सहभाग नोंदवला होता. तसेच देशातील विविध राज्यातील अनेक महिलांनी यामध्ये सहभागी घेतला होता. यासाठी या सर्व महिलांना गुजरात येथे प्रशिक्षण देण्यात आले होते. गुजरात येथे १५ दिवसांच्या प्रशिक्षणामध्ये मोहिते वडगावच्या वैष्णवी शिंदे यांनी उत्कृष्ट पद्धतीने ड्रोन चालविला व त्यांची कामगिरीही उत्कृष्ट होती. त्यामुळे महाराष्ट्रातून त्यांची निवड केली आहे. या निवडीबाबतचे पत्र राष्ट्रपती भवनकडून वैष्णवी शिंदे यांना प्राप्त झाले आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात समाजातील विविध स्तरांतील घटकांचा समावेश असावा, या हेतूने सरकारकडून काही नागरिकांना विशेष निमंत्रित केले जाते. यावर्षी ड्रोन दीदी योजनेत सहभागी असणाऱ्या वैष्णवी शिंदे यांना राष्ट्रपती भवन कार्यालयाकडून विशेष निमंत्रित केले आहे. ज्योतिर्लिंग कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून शिंदे यांची केंद्र शासनाच्या ड्रोन दीदी योजनेत निवड झाली होती. ड्रोन दीदी योजनेत संधी मिळवून दिल्याबद्दल अभिजित खारगे यांचेही त्यांनी विशेष आभार मानले.
यथोचित सन्मान
सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी वैष्णवी शिंदे यांना शुभेच्छा देत त्यांचा यथोचित सन्मान केला. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रपती यांच्यासोबत स्नेहभोजन
वैष्णवी शिंदे यांचा सर्व खर्च सरकारकडून केला जाणार असून त्यांच्यासोबत अजून एका सहकाऱ्याला कार्यक्रमासाठी उपस्थित राहता येईल. दिल्लीत राष्ट्रपती यांच्यासोबत या निमंत्रित पाहुण्यांना स्नेहभोजनाचा आस्वादही घेता येणार आहे.