महायुतीचे माप कोणाच्या पदरात?

By Admin | Updated: July 5, 2014 23:56 IST2014-07-05T23:56:01+5:302014-07-05T23:56:26+5:30

विधानसभा निवडणूक : तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात चर्चा

Under whose measurement of the greatness? | महायुतीचे माप कोणाच्या पदरात?

महायुतीचे माप कोणाच्या पदरात?

अर्जुन कर्पे ल्ल कवठेमहांकाळ
विधानसभेच्या निवडणुकीला तीन ते चार महिन्यांचा अवधी शिल्लक राहिला असताना, तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील महायुतीत मात्र उमेदवारी मिळवण्यासाठी चांगलीच जुंपली आहे. शिवसेनेचे दिनकर पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते महेश खराडे व माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्यामध्ये चढाओढ लागली आहे. उमेदवारी कुणाला मिळणार? महायुतीचे राज्यपातळीवरचे नेते, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना या घटक पक्षातील इच्छुकांना न्याय देणार? की भाजप यावेळी माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्या पारड्यात वजन टाकणार, याची जोरदार चर्चा सुरू आहे.
तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय रणांगणावर संघर्षाचे ढग जमू लागले असून, या लढाईत कोणत्याही परिस्थितीमध्ये गृहमंत्री आर. आर. पाटील यांना ‘चेकमेट’ करायचे, असा राजकीय डाव महायुतीच्या राज्यपातळीच्या नेत्यांकडून आखला जात आहे. या महिन्यात भाजपकडून उमेदवारी कुणाला द्यायची, यादृष्टीने निर्णायक व ठोस पावले उचलली जाणार आहेत.
लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने राष्ट्रवादीचे संजय पाटील यांना रणांगणात उतरवून काँग्रेसच्या पन्नास वर्षांच्या सत्तेला सुरूंग लावला. लोकसभेचे परिवर्तनाचे समीकरण विधानसभेलाही जमवायचे, त्यासाठी दमदार व राजकीय ताकदवान मोहरा विधानसभेच्या रणांगणात उतरवायचा यादृष्टीने भाजपच्या राज्य पातळीवरील नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. लोकसभेचा पैरा फेडण्यासाठी घोरपडे यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी खासदार संजय पाटील यांनी कंबर कसली आहे.
घोरपडे यांनीही कोणत्याही परिस्थितीमध्ये आगामी विधानसभा निवडणूक लढवायचीच, या हेतूने भाजपच्या राज्यपातळीवरील नेत्यांशी संपर्क व चर्चा सुरू केली आहे. नुकतीच त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांची मुंबई येथे भेट घेऊन महायुतीची उमेदवारी मिळावी यासाठी खासदार संजय पाटील यांच्या साक्षीने जोरदार फिल्डिंग लावली आहे. मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, चर्चा, गावनिहाय बैठका व राजकीय सापळे रचण्यास सुरुवात केली आहे. राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आणि खा. पाटील यांचे सहकार्य घोरपडे यांच्या बाजूने असल्याने उमेदवारीबाबत त्यांचे पारडे जड असल्याचे स्पष्ट चित्र आहे.
महायुतीचा प्रमुख घटक पक्ष असलेली शिवसेनाही तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघावर आपलाच हक्क आहे व आपणच दावेदार आहे, असे शिवसेनेचे दिनकर पाटील सांगत आहेत. त्यांनी ‘मातोश्री’वरून फिल्डिंग लावली आहे. आता महायुतीची उमेदवारी मागणाऱ्या अजितराव घोरपडे यांनी मागील विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज माघारी घेतला होता. त्यावेळी आपण किल्ला लढविला होता, त्यामुळे घोरपडे यांना उमेदवारी देऊ नये, असे त्यांचे म्हणणे आहे.
महायुतीचा दुसरा घटक पक्ष असलेली स्वाभिमानी शेतकरी संघटनाही उमेदवारी मागू लागली आहे. संघटनेचे राज्य प्रवक्ते महेश खराडे यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. खासदार राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून ते थेट नितीन गडकरी यांना भेटणार आहेत. त्यामुळे महायुतीची उमेदवारी देताना वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Web Title: Under whose measurement of the greatness?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.