सांगलीत उद्धवसेनेपुढे अस्तित्व टिकवण्याचे आव्हान, पहिल्या फळीतील सर्वच पदाधिकाऱ्यांचा रामराम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 16:01 IST2025-03-29T16:00:47+5:302025-03-29T16:01:44+5:30
सांगली : उद्धवसेनेच्या आजी-माजी जिल्हाप्रमुखांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी ‘जय महाराष्ट्र’ करत शिंदेसेनेचे शिवबंधन बांधले. त्यामुळे उद्धवसेनेला भले मोठे खिंडार पडले ...

सांगलीत उद्धवसेनेपुढे अस्तित्व टिकवण्याचे आव्हान, पहिल्या फळीतील सर्वच पदाधिकाऱ्यांचा रामराम
सांगली : उद्धवसेनेच्या आजी-माजी जिल्हाप्रमुखांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी ‘जय महाराष्ट्र’ करत शिंदेसेनेचे शिवबंधन बांधले. त्यामुळे उद्धवसेनेला भले मोठे खिंडार पडले आहे. पहिल्या फळीतील जवळपास सर्वच पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकल्यामुळे उद्धवसेनेच्या जिल्ह्यातील अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या उद्धवसेना सांभाळणाऱ्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी पक्षांतर केल्यामुळे उर्वरित उद्धवसेना सैरभैर झाली आहे. त्यांना धीर देण्यासाठी काहींनी पुढाकार घेतला आहे.
शिवसेनेच्या स्थापनेपासून जिल्ह्यात अनेक पदाधिकारी एकनिष्ठपणे काम करत होते. परंतु, गेल्या काही वर्षात राज्यातील उलथापालथ झाल्यानंतर येथेही त्याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. ‘आयाराम - गयाराम’ जवळपास सर्वच पक्षात पाहायला मिळत आहेत. शिवसेना ही उद्धवसेना आणि शिंदेसेना यांच्यात विभागली गेल्यानंतर जिल्ह्यातही तेच चित्र पाहायला मिळाले. येथेही निष्ठावान आणि गद्दारीचे आरोप - प्रत्यारोप झाले. उद्धवसेना आणि शिंदेसेना या दोन्ही सेनेतही पदाधिकारी होते.
उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात किल्ला लढवत ठेवला होता. परंतु, नुकतेच शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धवसेनेला भले मोठे खिंडार पाडले. जिल्हाप्रमुख संजय विभुते, माजी जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, युवासेनेचे ऋषिकेश पाटील, मिरजेचे प्रा. सिद्धार्थ जाधव, सुनीता मोरे यांच्यासह काही तालुकाप्रमुखांनी उद्धवसेनेची साथ सोडून शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यामुळे उद्धवसेनेत सध्या पहिल्या फळीतील कोणीही पदाधिकारी शिल्लक राहिले नाहीत.
एकाचवेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी उद्धवसेना सोडल्यामुळे कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. आता दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांना जिल्हा सांभाळण्याची जबाबदारी आली आहे. त्यामुळे त्यांनी तातडीने एकत्र येऊन कार्यकर्त्यांना धीर दिला. कितीही पदाधिकारी पक्ष सोडून गेले तरी उद्धवसेना जिल्ह्यात कार्यरत राहील, असे त्यांनी सांगितले. परंतु, ते किती काळ आणि कोणाच्या भरवशावर टिकून राहणार? हे येणाऱ्या काळात दिसून येईल.
उद्धवसेनेचा मिरजेत यल्गार
सांगली - मिरज विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी मिरजेत एकत्र येऊन यल्गार पुकारला. ‘उद्धव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. शिवसैनिक हा शिवसेनेचा प्राण असल्यामुळे काहीही फरक पडणार नाही, असे सांगण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख शंभुराज काटकर, महादेव मगदूम, तानाजी सातपुते, विष्णू पाटील, सुजाता इंगळे, संजय काटे, चंद्रकांत मैगुरे, महादेव हुलवान, विराज बुटाले, विठ्ठल संकपाळ, किरण पवार, ओंकार देशपांडे, गणेश लोखंडे आदी उपस्थित होते.